विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील मविआला तितका फायदा होईल : शरद पवार

Jun 15, 2024 - 15:12
 0
विधानसभा निवडणुकीत मोदी जितक्या सभा घेतील मविआला तितका फायदा होईल : शरद पवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 सभा आणि एक रोड शो झाला. या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी ( PM Modi) जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करेल, अशी खोचक टिप्पणी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.

ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या (MVA Allaince) संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना आवर्जून एक गोष्ट लक्षात आणून दिली. शरद पवार यांनी म्हटले की, आमच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. ती म्हणजे, महाराष्ट्रात ज्या काही अन्य पक्षांच्या सभा झाल्या, देशाच्या पंतप्रधानांच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा आणि रोड शो झाला त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढं आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने स्पष्ट वाटचाल होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो, असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत थेट नरेंद्र मोदी यांच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे महायुती आणि एनडीए आघाडीचे सर्वात मोठे स्टार प्रचारक होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे महाराष्ट्रात मोदींचा करिष्मा तितकासा चालला नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे. आता शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सभांचा स्ट्राईक रेटचा मुद्दा उपस्थित करत या चर्चेला आणखी हवा दिली आहे. त्यामुळे आता भाजप आणि महायुतीचे नेते यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राची अजित पवारांवर टीका, शरद पवार म्हणाले...

अजित पवार यांच्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, अशी टीका नुकतीच संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर नियतकालिकातून करण्यात आली होती. याविषयी शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले की, त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितला. पण त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे की, महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहे, पण ती आता आम्ही बोलू इच्छित नाही, असे उत्तर शरद पवार यांनी दिले. देशात होत असलेल्या सत्तेच्या गैरवापरासंबधी या निवडणुकीतून लोकांनी जी भूमिका घेतली, त्यामधून शहाणपणा शिकतील, अशी अपेक्षा होती. पण तो शहाणपणा सरकार शिकेल, असे दिसत नाही. त्यामुळे आणखी दोन-तीन महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी मिळेल, तेव्हा लोक पूर्ण विचार करुन ठोस निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी म्हटले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow