Maharashtra Budget 2024 : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, अर्थमंत्र्यांची घोषणा

Jun 28, 2024 - 15:05
Jun 28, 2024 - 15:11
 0
Maharashtra Budget 2024 : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, अर्थमंत्र्यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वसामान्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करत महायुती सरकारने वाहन चालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्यात आली आहेत.

किती रुपयांचा दिलासा?

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर ६५ पैशांनी, तर डिझेलचे दर दोन रुपये सात पैशांनी कमी करण्यात आले आहे. महागाईचा फटका बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच व्यवसाय कर, मुद्रांक शुल्काबाबतही दिलासादायक तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीकडे आता सर्व सामान्य नागरिक आणि वाहन चालक मालक यांचे डोळे लागून राहिले आहेत.

मूल्यवर्धित कर राज्यभरात समान

पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महापालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे.

काय आहे प्रस्ताव?

पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैशांवरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे इतका करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:32 28-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow