उद्धव ठाकरे १८ ला देवरुखमध्ये

रत्नागिरी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १८ एप्रिल रोजी रत्ना.–सिंधु. लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ देवरूखमध्ये जाहीर सभा होणार आहे. १८ रोजी दुपारी ११ वाजता ही सभा होणार असून या सभेची जोरदार तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात डझनभर उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असले तरी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या मुख्य लढतीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी जोरदार मुसंडी मारत निलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नारायण राणे हे पुत्र निलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी जीवतोड मेहनत करत आहेत. मुळात कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. शिवसेना आणि नारायण राणे यांचं वैरत्व उभ्या महाराष्ट्राने ‘याची देही, याची डोळा’ पाहिलं आहे. शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत. आपल्या प्रचारसभांमधूनही राणे उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. आता त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे देवरूखच्या सभेत नारायण राणेंवर कशा पद्धतीने शाब्दिक ‘बाण’ चालवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here