एलईडी मासेमारी तत्काळ बंद करा अन्यथा परवान्यांचे कायमरित्या निलंबन

रत्नागिरी दि. १० : रत्नागिरी जिल्हयात समुद्रात होणारी एलईडी मासेमारी तत्काळ बंद करण्याचे निर्देश प्रधान सचिव पदुम अनुपकुमार यांनी आज येथे दिले. अशा स्वरुपाची नियमबाह्य मासेमारी करणाऱ्यांचे परवाने कायमस्वरुपी निलंबित होतील असा इशारा ही त्यांनी दिला. पारंपारिक पध्दतीने होणारी मासेमारी आणि एलईडी मासेमारी असा संघर्ष रत्नागिरी जिल्हयात मोठया प्रमाणात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील अल्पबचत सभागृहात मासेमारी करणाऱ्यांची बैठक त्यांनी आज घेतली. मासेमारी बाबत असणारा कायदा जुना झाला असल्याने तो बदलण्याची गरज आज निर्माण झाली आहे असे सांगून अनुपकुमार यावेळी म्हणाले की याबाबत केंद्रीय स्तरावर अभ्यास झालेला आहे.त्यातील चांगल्या बाबींचा समावेश करुन सर्वकष धोरण निर्मिती व नवा कायदा निर्मितीसाठी आपण आग्रही राहू परंतु त्यासाठी एलईडी मासेमारी तत्काळ बंद करणै आवश्यक आहे. एलईडी  मासेमारी बंद व्हावी याबाबतचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत तथापि मासेमारी करणाऱ्यांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे असे अनुपकुमार म्हणाले.

कायदा महत्वाचा

मासेमारी करणाऱ्यांसमवेत शासन कायम उभे राहिले आहे मात्र मी कुणालाही कायदा हाती घेऊ देणार नाही असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले. मच्छीमारांच्या कन्टेनर गोव्यात अडवल्या जात होत्या. त्यावेळी आपण शासन म्हणून खंबीरपणे जिल्हयातील मच्छीमारांसोबत उभं राहून साथ दिली असेही चव्हाण म्हणाले. आपले मुद्दे विकासाशी निगडीत आहेत त्याचा जरुर विचार होईल मात्र शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करुन आपण मासेमारी करा असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाणयांनी याप्रसंगी केले. या बैठकीस पशुसंवर्धन ,दुग्ध व मत्स्यव्यवसाय पदुम उपसचिव श्रीनिवास शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, सहा. मत्स्य आयुक्त आंनद पालव, तहसिलदार शशिकांत जाधव व जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदिंचीही उपस्थिती होती.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here