चेन्नईचा पंजाबवर २२ धावांनी विजय

चेन्नई : वृत्तसंस्था 

मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवातून सावरत चेन्‍नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबर 22 धावांनी विजय मिळवला. चेन्‍नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 160 धावा केल्या. के. एल. राहुल आणि सर्फराज खान यांच्या अर्धशतकानंतरही पंजाबला हे आव्हान पेलले नाही. त्यांनी 20 षटकांत 5 बाद 138 धावा केल्या.

विजयासाठी 161 धावांचे आव्हान करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवातच खराब झाली. दुखापतीनंतर संघात परतलेला ख्रिस गेल (5) आणि मयंक अगरवाल (0) हे दोघे स्वस्तात बाद झाले. हरभजनने या दोघांना एकाच षटकांत बाद केले. पण यानंतर के. एल राहुल आणि सर्फराज खान यांनी डाव सावरत शतकी भागीदारी केली. ही जोडी संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असताना राहुल (55) बाद झाला आणि सामन्याला कलाटणी मिळाली. पाठोपाठ मिलरही बाद झाला. सर्फराज (67) बाद झाला तेव्हा सामना पंजाबच्या हातून कधीच निसटला होता. शेवटी त्यांची मजल 138 वर थांबली.

तत्पूर्वी, मोसमातील पहिलाच सामना खेळत असलेल्या फाफ ड्यू प्लेसिसच्या झुंजार अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्या नाबाद 37 धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 161 धावांचे आव्हान ठेवले. चेन्‍नईकडून ड्वेन ब्राव्होच्या जागी फाफ ड्यूप्लेसिसला संधी मिळाली. 
धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर चेन्नईला शेन वॉटसन आणि फाफ दु प्लेसिस यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची सलामी दिली. आर. अश्विनने वॉटसनला (26) बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या रैनाने (17) प्लेसिसला साथ देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. अश्विनने एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या प्लेसिसला (54) आणि रैनाला लागापोठच्या चेंडूवर आश्विननेच माघारी धाडत चेन्नईला धक्का दिला.  स्थिरावलेले दोन्ही  फलंदाज बाद झाल्यानंतर धोनीने आणि अंबाती रायुडूने 38 चेंडूत 60 धावांची भागीदारी करत चेन्नईला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. चेन्नईने 20 षटकांत 3 गडी गमावून 160 धावा केल्या.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here