जान्हवी पाटील : एक समाजमान्य पत्रकार…

आयुष्य सुंदर होण्यासाठी संवादाची गरज असते असे टेलिफोनचे निर्माते ग्रॅहम बेल यांनी म्हटले होते. मग तो संवाद शाब्दिक, जाणिव, गरजांच्या पातळीवर झाला तरी त्याची व्यापकता वाढत जाते. दै. तरुण भारतच्या पत्रकार जान्हवी पाटील यांच्या बाबतीतही असेच घडले. सामाजिक बांधिलकी असणाऱ्या जान्हवी पाटील पत्रकारिता क्षेत्रात असल्याने हळूहळू त्यांची शब्दांशी विण घट्ट होत गेली.त्यांचे अनुभव,वाचन,विचार,दृष्टिकोन यांचा अंतर्भाव त्यांच्या लिखाणात झाला व त्यांची लेखणी बहरत गेली.स्वतःमध्ये ‘पॉझिटीव्ह’ बदल करून ते लोकांपर्यंत संक्रमित करण्याचे धारिष्ट, समाजसेवेचा वसा यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा पोत चमकत गेला, हळूहळू त्याची नोंद लोकांनी घेतली व त्यांच्या पत्रकारितेला शासनस्तरावर वारंवार गौरवण्यात आले.
त्यांच्या पत्रकारितेला 2010 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारापासून शासनस्तरावर नोंद घ्यायला सुरुवात झाली व त्या पाठोपाठ राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर, शि. म. परांजपे, शर्फ मुकादम पुरस्कार, पर्यावरण शास्त्राचा जिल्हा पुरस्कार, रत्नागिरी भुषण ते नुकताच जाहिर झालेला भास्कर अॅवार्ड(गोवा)-2019 या पुरस्कारांची शृंखला तयार झाली. त्यांच्या लिखाणाला लोकमान्यताच नव्हे तर शासनमान्यता मिळाल्याची पावती त्यांना मिळत गेली.
स्वतःचे जीवनमूल्य जपत, इतरांना न दुखवता आपले चौफेर व्यक्तीमत्व घडवले. जे जे सर्जक आहे ते त्यांनी लोकांसमोर मांडले. स्वतःच्या आचार, विचार, पत्रकारितेत समृद्ध होत असताना त्यांचे पती विनोद पाटील यांचे योगदान-प्रोत्साहन, आई वडीलांचे त्यांच्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व, दै. तरुण भारत व मराठी पत्रकार परिषद यांचा उल्लेख त्या आवर्जून करतात. सुरुवातीच्या काळात कठीण परिस्थितीतून सावरुन अगोदर रुजण्याची मग फुलण्याची प्रक्रिया त्यांनी अंगिकारली. संसार, लहान मुलाचे पालकत्व, पत्रकारिता, सामाजिक काम सगळ्याला योग्य न्याय देऊन त्या प्रत्येक पातळीवर यशस्वी होताना दिसत आहेत. आगामी काळात त्यांच्या हातून सृजन काम होत राहो हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा….

आनंद तापेकर, आवृत्ती प्रमुख दै. रत्नागिरी एक्स्प्रेस

1 COMMENT

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here