जालियानवाला बाग हत्याकांड ब्रिटन आणि भारताच्या इतिहासातील खेदजनक घटना- ब्रिटिश उच्चायुक्त

अमृतसरमध्ये ब्रिटिश काळात झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज, 13 एप्रिलला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने याठिकाणी या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शनिवारी जालियनवाला बागमधील स्मारकाला भेट दिली आणि शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त डोमिनिक एसक्विथ यांनीही याठिकाणी हजेरी लावली आणि शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी डोमिनिक एसक्विथ यांनी येथील अभिप्राय नोंदवहीत (visitor’s book) एक संदेश लिहिला आहे.
डोमिनिक एसक्विथ यांनी अभिप्राय नोंदवहीत लिहिले आहे की, ‘जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. ब्रिटिश आणि भारतीय इतिहासातील सर्वात खेदजनक घटना आहे. जे झाले, त्याच्यासाठी आम्ही दु:खी आहोत. मला आशा आहे की, 21 व्या शतकात भारत आणि ब्रिटन यांच्यातील सहकार्य कायम राहिल याबद्दल आम्ही प्रतिबद्ध आहोत’. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ब्रिटिश पंतप्रधान तेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला होता.
ब्रिटिश काळात अमृतसरमधील जालियनवाला बागेत 13 एप्रिल 1919 रोजी एका सभेत लोक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. शहरात लष्करी कायद्याचा अंमल होता, जमावबंदीचा हुकूम काढण्यात आला होता. तरीही लोक त्या सभेसाठी एकत्र जमले. योगायोगाने त्या दिवशी बैसाखीचा सण होता. त्यावेळी जनरल डायर या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला. या गोळीबारात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला होता.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here