‘प्रभू’ कृपेने कोकण रेल्वेचे विद्युतीकरण सुसाट

कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. यासाठी रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम जवळपास अंतिम टप्यात आले आहे. त्यापुढील काम देखील युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास वेगवान होण्याचे स्वप्न दृष्टीपथात येऊ लागले आहे. कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच विद्युतीकरण करण्यात यावे, अशी दीर्घकाळची मागणी तत्कालीन रेल्वेमंत्री आणि कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांच्या कारकार्दीत मार्गी लागली. यासाठी निधीची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. सुरेश प्रभू यांच्याच रेल्वे मंत्रीपदाच्या कारकीर्दीतच रायगडमध्ये या दोन्ही कामांचा शुभारंभ २०१५ मध्ये करण्यात आला. ‘कोरे’च्या दुपदरीकरण तसेच विद्युतीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर २०१६ मध्ये या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यातील दुपदरीकरणाचे काम टप्प्या टप्प्यात करण्यात येत आहे तर कोकण रेल्वेचे विद्युतीकरण मात्र पूर्ण मार्गाचे करण्यात येत आहे. या कामाची सध्याची स्थिती पाहता रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणासाठी खांब उभारणी जवळपास पूर्ण झाली आहे. याचबरोबर कोकण रेल्वेच्या दक्षिण टोकाकडूनही विद्युतीकरणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. विद्युत खांब टाकून पूर्ण झालेल्या रोहा ते रत्नागिरी टप्प्यात लवकरच ओव्हरहेड विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोकण रेल्वेचा मार्ग सध्या एकेरी असल्याने माल तसेच प्रवासी गाड्यांचा वाढलेला ताण लक्षात घेऊन मार्गाचे पॅच डबलिंग तसेच जास्त अंतर असलेल्या दोन स्थानकांमध्ये ११ नवीन स्थानकांची निर्मिती करण्यात येत आहे. या स्थानकांमध्ये जिल्ह्यातील कळंबणी, असुर्ड, कडवई, वेरलवली या स्थानकांचा समावेश आहे. या नव्या स्थानकांमुळे एकेरी मार्गावर गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी लागणारा वेळ वाचणार आहे.
या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here