फोर्ब्सच्या सर्व्हेनुसार ‘एचडीएफसी’ ठरली देशातील सर्वोत्तम बँक

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फोर्ब्ज’ मासिकाने केलेल्या ‘वर्ल्ड्स बेस्ट बँक सर्व्हे’ या अभ्यासानुसार देशातील सर्वोत्तम बँकांच्या सूचीत एचडीएफसी बँकेने ग्राहककेंद्रित सेवांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ‘फोर्ब्ज’ने हा अहवाल मार्केट रिसर्च फर्म ‘स्टॅटिस्टा’च्या साह्याने केला असून, त्यामध्ये २३ देशांतील बँकांचा आढावा घेण्यात आला आहे. देशातील बँकांची क्रमवारी निश्चित करीत असताना ‘फोर्ब्ज’तर्फे बँकांची आर्थिक स्थिती, ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक आदी कोणतेही निकष लक्षात न घेता केवळ ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेचा निकष लावण्यात आला आहे. बँकांची क्रमवारी निर्धारित करण्यासाठी ग्राहकांचा बँकेवर असणारा विश्वास, अटी आणि शर्ती,ग्राहकांना मिळणारी सेवा, डिजिटल सेवा आणि आर्थिक सेवा आदी निकषांचा आधार घेण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे देशातील पहिल्या १० बँकांच्या सूचीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेला स्थान मिळवता आलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि आपल्या ४.३० कोटी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊन ‘एचडीएफसी बँके’ने देशातील बँकांमध्ये अग्रस्थान पटकावले आहे. ‘एचडीएफसी बँके’ पाठोपाठ खासगी क्षेत्रातीलच आयसीआयसीआय बँकेने दुसरा क्रमांक पटकावला असून, तिसरा क्रमांक सिंगापूरस्थित मुख्यालय असलेल्या डीबीएस बँकेने पटकावले आहे. त्या पाठोपाठ कोटक महिंद्र बँक आणि आयडीएफसी बँकेने अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, विजया बँक आणि खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने अनुक्रमे सहा ते दहा क्रमांक पटकावले आहेत. स्टेट बँक सूचीत अकराव्या क्रमांकावर आहे. या सूचीत कॅनरा बँक तिसाव्या स्थानावर आहे.


या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here