मतदानादिवशीच प्रात्यक्षिक परीक्षा; ‘अभाविप’ ने घेतली कुलसचिवांची भेट

दापोली: संपूर्ण देशात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात असतानाच कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न असणान्या महाविद्यालयातील नवमतदार विद्यार्थी मात्र मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. १८ व २३ एप्रिल या दोन दिवशी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याला विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. शासनाने सुटी जाहीर केली असतानाही २३ एप्रिलला प्रात्यक्षिक परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत १५ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन केले आहे. निवडणुकीच्या कालावधीत १८ व २३ एप्रिलला परीक्षा होणार आहेत. २३ एप्रिलला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकीकडे सर्वांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग विविध मार्गाने मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करत आहे. मात्र अनेक कृषी महाविद्यालयांनी १८ व २३ एप्रिलला प्रात्यक्षिक परीक्षा ठेवल्याने विद्यार्थी मतदानापासून वंचित राहणार आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश संयोजक अक्षय जंगम यांनी या लोकशाहीच्या उत्सवात लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थी मतदारांनी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

परीक्षा न घेण्याबाबत परिपत्रक पाठविणार : सावंत

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. या दोन दिवशी परीक्षा घेऊ नये असे परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here