मी जन्माने गवळी पण कर्माने कुणबी : सुनील तटकरे

आ. भास्कर जाधवांना केवळ 47 दिवस कामगार मंत्रीपद मिळाले. या 47 दिवसांत त्यांनी केलेली कामगिरी अनेक नेत्यांना  तोंडात बोट घालायला लावणारी आहे. मी स्वतः जातीने गवळी असलो तरी माझ्या मतदारसंघात मी कर्माने कुणबी आहे. म्हणूनच कुणबी समाजासाठी  प्रत्येक तालुक्यात किती सभागृहे उभी केलीत व विकासाची कामे केलीत ते कुणीही  जाऊन  तपासू शकता, असे प्रतिपादन रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी मार्गताम्हाणे येथे केले. 

चिपळूण  तालुका राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे मार्गताम्हाणे येथील शिर्के मंगल कार्यालयात तटकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या सभेला आ. भास्कर जाधव, पं. स. सभापती पूजा निकम, चित्रा चव्हाण, जि. प. सदस्या दिशा दाभोळकर, चिवेलीच्या सरपंच प्रमिला शिर्के, जि. प. विरोधी गटनेते विक्रांत जाधव, जयद्रंथ खताते काँगे्रस, सुरेश कातकर, महेंद्र कदम यांच्यासह मार्गताम्हाणे, रामपूर जि. प. गटातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी सुनील तटकरे पुढे म्हणाले की, देशात आता परिवर्तनाची हवा आहे. माझ्या व आ. भास्कर जाधव यांच्या मंत्रिपदाच्या काळात कोकणासाठी भरीव तरतूद झाली आहे. वाडी जोडरस्ते कार्यक्रम व साकव कार्यक्रम आम्हीच सुरू केला. ‘मेक इन इंडिया’,  ‘स्टार्टअप इंडिया’  आणि ‘डीजिटल इंडिया’चा गाजावाजा न करता देशाला सर्व क्षेत्रात मजबूत करण्याचे काम काँगे्रस आघाडी सरकारने केले आहे.
आपल्या भाषणात तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यांनी उद्योग सोडा एका हाताला काम तरी दिले आहे का, असा आरोप करुन आपणामुळे रोहा एमआयडीसीमध्ये किती स्थानिक तरूणांना रोजगार मिळाला आहे हे ही पाहू शकता. इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा व संवेदना असणारा लोकप्रतिनिधी जनतेशी बांधिलकी स्विकारू शकतो. केवळ समाजाच्या नावावर मते मागून अनंत गीतेंनी स्वतःचा फायदा केला. मात्र, समाजाला वार्‍यावर सोडले हे वास्तव आहे. मार्गताम्हाने हे गाव डॉ. तात्यासाहेब नातू यांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रथम त्यांच्या स्मृतींना वंदन करुन आल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here