राज ठाकरेंच्या प्रचार सभांचा खर्च कोणाच्या खात्यात टाकणार?- तावडे

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केला नाही. मग राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचार सभा कोणासाठी आहेत आणि या जाहिर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा यासंदर्भात राज्य निवडणुक आयोगाने स्पष्ट करावे अशी मागणी भाजपा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. या सभांमधून राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या, शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करत आहेत. हा प्रचारप्रत्यक्षपणे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे. या प्रचार सभांचा खर्च कोणताच उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात दाखवित नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखविला पाहिजे ही बाब स्पष्ट होत नाही, असे मा. तावडे यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे जर कोणत्याच उमेदवाराचे नांव घेत नसतील तर तो खर्च त्या उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा असा प्रश्नउपस्थित केला जाऊ शकतो. परंतु राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. त्यामुळे आमचे असे मत आहे की, त्या ठिकाणच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च दाखविणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत याचे स्पष्टीकरण घ्यावे. असेही श्री.तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here