लोकसभा निवडणूक २०१९: गुगलचं खास ‘डूडल’

भारताच्या सार्वत्रिक निवडणुका आजपासून सुरु होत १९ मे पर्यंत सुरु राहणार आहेत. या निवडणुका एकंदर ७ टप्प्यात होणार असून आज त्याचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. विविध पक्षांची आणि दिग्गजांची भवितव्ये मतपेटीत बंद होणार आहेत. ठिकठिकाणी मतदान होणार असल्याने निवडणूक आयोगासह सर्वच पक्षांतून, सामाजिक कार्यकर्त्यांपासून कलाकारांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून लेखकांपर्यंत सर्वांनीच जनतेला ‘शत प्रतिशत’ मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सारी कामे बाजूला ठेवून आधी मतदानाचा हक्क बजावणे, देशहितासाठी मतदान करण्याचे आवाहन सर्वच स्तरातून होत असताना ‘गुगल’ तरी कसे पाठी राहील? विविध दैनंदिन विषयांवर गुगल आपले ‘डूडल’ प्रदर्शित करत असते. आज एक पाउल पुढे टाकत १७ व्या भारतीय लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे गुगलने छान ‘डूडल’ प्रदर्शित करत मतदानाचे आवाहन केले आहे. हे ‘डूडल’ साकारून गूगलने भारतीय लोकशाहीचा सन्मानच केला आहे. या ‘डूडल’ मध्ये तर्जनीवर (इंडेक्स फिंगर) मतदानाची शाई लावलेली दिसत आहे. त्याचप्रमाणे या ‘डूडल’ वर क्लिक केल्यावर मतदान कसे कराल यावर मार्गदर्शनही गुगलने केले आहे. यावरून भारतीय सार्वत्रिक निवडणुकांवर जगाचे लक्ष लागून राहिले असून आता २३ मे ला निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे.

या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here