‘हापूस’ घसरला

रत्नागिरी: जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर जास्त काळ न राहिल्याने हापूस बचावल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे; मात्र आवक कमी असूनही वाशी बाजारातील पेटीचा दर पाचशे रुपयांनी घसरला आहे. ही घसरण कायम राहिली तर मे महिन्यात जाणाच्या फळाला कवडीमोलाचा दर मिळेल, अशी भीती बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. वादळी वा-यासह चिपळूण, राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्वरात पाऊस झाला. सायंकाळच्या सत्रात पडलेला हा पाऊस अर्धा ते एक तासच होता. हाच पाऊस रात्रीच्यावेळी पडला असता तर फळाच्या देठाला पाणी राहिले असते आणि दमटपणामुळे अॅथ्रॅक्सनोजचा प्रादुर्भाव झाला असता. ज्या ठिकाणी पाउस झाला तेथील आंबा लवकरात लवकर तयार होण्यास मदत होईल अशी शक्यता आहे. गेले काही दिवस उन्हाचा ताप वाढल्यानंतर वाशी मार्केटमध्ये जाणा-या पेट्यांचीही संख्या वाढली होती. दररोज तीस ते पस्तीस हजार पेट्यांची संख्या ५३ हजारांवर पोचली आहे. उत्पादन कमी असल्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. सर्वाधिक माल वाशीला जात असून तेथे म्हणावा तसा दर मिळत नाही. गतवर्षी चार हजार रुपयांपर्यंत चांगल्या फळाला दर मिळत होता; मात्र यावर्षी ३२०० ते ३५०० रुपयांपर्यंतच दर मिळत आहे. डागी फळाच्या पेटीचा दर १८०० रुपये आहे. पाचशे रुपयांनी दर कमी मिळाल्याने मे महिन्यात अधिकची घसरण होणार आहे. ५५ हजारपेक्षा अधिक हापूस आला असून कर्नाटकचीही आवक वाढली आहे. त्यामुळे दर कमी झाल्याचे कारण वाशीमधून दिले जात आहे.
या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here