हेलिकॉप्टरला विमान धडकून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

काठमांडू : नेपाळच्या एव्हरेस्ट भागातील लुक्ला विमानतळावर (तेनझिंग- हिलरी विमानतळ) प्रवाशांसह निघालेले एक छोटे विमान रविवारी (ता.१४)उड्डाणाच्या तयारीत असताना धावपट्टीवर बंद पडले आणि दोन हेलिकॉप्टर्सना जाऊन धडकले. यात सह वैमानिकाबरोबरच दोन पोलिसही ठार झाले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. समिट एअरचे ९ एन- एएमएच उड्डाणाच्या तयारीत असताना ३० ते ५० मीटर अंतरावरील हेलिकॉप्टर्सना जाऊन धडकले. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ता प्रतापबाबू तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिपॅडपजवळ असलेले सहवैमानिक एस. धुंगना आणि सहायक उपनिरीक्षक राम बहादूर खडका यांचा या अपघातात मृत्य झाला असून, सहायक उपनिरीक्षक रुद्र बहादूर श्रेष्ठ हे या अपघातात जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना काठमांडूला आणण्यात आले. ग्रँड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विमान चालवत असलेले कॅप्टन आर. बी. रोकाया आणि मनांग एअरचे कॅप्टन चेट गुरुंग या अपघातात जखमी झाले असून, त्यांच्यावरही ग्रँड रुग्णालयात उपचार सुरू होते. आता मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळविण्यात आले आहे.


या बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा

Please enter your comment!
Please enter your name here