सावित्री नदीला पुर; पाच गावाचा संपर्क तुटला

0

पोलादपूर : रायगड जिल्‍ह्‍यातील पोलादपूर तालुक्यात २०९ मिलिमीटर पावसाची नोंद एका दिवसात झाल्याने तालुक्यातील सावित्री, कामथी, ढवली, धोडवली, चोळई नद्यांची पात्र दुथडी भरून वाहत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पहाटे चारच्या सुमारास पोलादपूर शहरातील गंगामता मंदिर, परिसरात सावित्रीच्या पाण्याने शिरकाव केला होता. मात्र पाणी वेळीच ओसरले असले तरी पावसाचे रूप पाहत पुराचा संभाव्य धोका उदभवण्याची शक्यता आहे. तर माटवण येथील मोरीवरून सावित्री नदीच्या पुराचे पाणी गेल्याने पाच गावाचा संपर्क तुटला होता. गाड्या अडकून पडल्या होत्या. तर गोवेले साळविकोंड- तळ्याचिवाडी मार्गावरील मोरी खचली असून तातडीची दुरुस्ती न केल्यास गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता दिसून येत आहे. पावसाचा जोर पाहता पुन्हा आपत्तीची टांगती तलवार लटकत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर महाड बाजारपेठेत मध्यरात्री ३.३० च्या सुमारास पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाची धांदल उडाली होती.तालुक्यातील रेवतले पूल पाण्याखाली गेल्याने दापोली मंडणगडकडे जाणाऱ्या मार्ग बंद झाला होता. तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. २००५ सारखी आपत्ती ओढवणार नाही या चिंतेने पोलादपुरातील नागरीक भीतीयुक्त वातावरणाने त्रस्त झाले आहेत. पहाटे ६ च्या सुमारास सावित्री नदीच्या पाण्याने सखोल भागात शिरकाव केला असला तरी काही तासात माघार घेत संथ वाहते कृष्णमाई या ओळी नुसार सावित्री नदीने संथ वाहण्यास सुरवात केली आहे.  तरी तिचे पात्र कधीही बदलू शकते. तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता,  विद्यार्थ्यांना पोलादपूरकडे येत असताना बोरज फाटा ते देवळे या मार्गावर पडलेल्या दरडीचा त्रास सहन करावा लागला.  रात्री वस्तीला गेलेल्या गाड्या परतीच्या मार्गावर असताना सकाळी ६ ची लहुलसे ते परेल व लहुलसे ते पोलादपूर या दोन   गाड्या  अडकून पडल्याने बसमधील प्रवाशांना निश्चित ठिकाणी पोहचण्यास विलंब झाला. याठिकाणी डोंगर कड्यावरील माती खाली आल्याने या मार्गावरील संपर्क तुटला आहे. पोलादपूर व महाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या  व महाड तालुक्यातील जवळ असल्याने महाड बाजूचा संपर्क तुटला होता माटवण येथील मोरीवरून सावित्री नदीच्या पुराचे पाणी वाहू लागल्याने सप्तक्रोशीतील सवाद, धारवली, कालवली, वावे, हावरे आदी गावांशी संपर्क तुटला आहे. पोलादपूरला पावसाचा जोर आणि समुद्रात भरतीची वेळ असल्याने  पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील गोवेले साळविकोंड- तळ्याचिवाडी मधिल रस्ता धोक्या असल्याने मोरी तुटल्याने अर्ध्यावर रस्ता खचला आहे भविष्यात या ठिकाणी तातडीने दुरुस्ती न केल्यास संपूर्ण रस्ता वाहून जाण्याची शक्यता दिसून येत आहे. गेली २५ वर्ष या रस्‍त्‍याकडे लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष खेदजनक म्हणावे लागेल.  त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. महाड व  पोलादपूरमध्ये  पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. तसेच माटवण मार्गावर पाणी आल्याने या ठिकाणची वाहतूक बंद झाल्‍याने ग्रामस्थांचा संपर्क तुटला होता. मात्र काहीवेळात पाणी ओसरल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. तरीही महाबळेश्वर येथे पडत असलेल्या पावसामुळे तसेच समुद्रात भरती असल्याने पुन्हा पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here