कोकणात गणेशोत्सवाची जोरदार तयारी

0

सिंधुदुर्ग : जसा जुलै महिना संपला तसा भातशेतीच्या लावणीचा हंगामही संपला आहे. बुधवारी योगायोगाने गटारीचा मुहूर्त साधत लावणीची कामे आटोपलेल्या शेतकर्‍यांनी चिखलधुणीही साजरी केली. आता सणवार सुरू झाले आहेत. नागपंचमी येणार्‍या 5 तारखेला आहे. त्यामुळे 2 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवाची जोरदार तयारी कोकणात सुरू झाली आहे. हौसेने गणरायाच्या दर्शनासाठी आपल्या गावाकडे धाव घेणार्‍या मुंबईकर चाकरमान्यांनी सप्टेंबर महिन्यातील रेल्वे गाड्या आरक्षित केल्यामुळे त्या फुल्ल झाल्या आहेत. पावसाळ्याचे दोन महिने संपल्यामुळे व्यापार्‍यांनीही मंदीला झटकून टाकत आपली दुकाने सजविण्याची तयारी सुरू केली आहे. यावर्षी गणेश चतुर्थी 2 सप्टेंबर रोजी येत आहे. गेल्यावर्षी 13 सप्टेंबरला गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता. यावर्षी दहा-अकरा दिवसांनी अगोदर हा उत्सव येत आहे. कोकणातील सर्वांत मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. रेल्वेने चार महिने अगोदर आरक्षणाची सुविधा केल्याने या कालावधीचा लाभ घेवून मे महिन्यापासूनच रेल्वे बुकिंग सुरू झाले होते. गणेशोत्सवामध्ये नवनवीन प्रकारच्या गणेशमूर्ती आणून पूजन करण्याचा कल वाढला आहे. पारंपरिक गणेशमूर्तींबरोबरच अगदी हटके स्वरूपाच्या काही मूर्त्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे मूर्ती शाळांमधील मूर्तिकार नवनवीन मूर्त्या बनविण्यात व्यस्त आहेत. रंग, माती यांचे दर दरवर्षीप्रमाणे वाढतच चालले तरी आकर्षक मूर्ती घरी आणण्याची आवड काही कमी झालेली नाही. त्यामुळे मूर्तिकार रंग, माती मिळेल त्या किंमतीत घेवून मूर्ती बनविण्याच्या कामाला लागले आहेत.  पर्यावरणाच्यादृष्टीने मूर्ती बनविण्याचा कलही वाढला आहे. संपूर्ण जुलै महिन्यात कोकणात धो-धो पाऊस कोसळला. गेल्यावर्षीच्या सरासरीपर्यंत पोहोचला आहे. या काळात भात लावणीची कामे होती, त्यामुळे बाजारात ग्राहकांची तुरळक गर्दी होती. आता ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंरत आणि गणेशोत्सवाला एक महिना उरल्यानंतर व्यापारीही सतर्क झाले आहेत. बाजारात ग्राहकांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या वस्तूंची मागणी येवू शकते, याचा अंदाज बांधून याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबतची मागणी करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचेही काम सुरू झाले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here