साईराज-चिराग यांनी बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब मिळवला

0

बँकॉक : भारताचे सात्विक साईराज रनकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करीत थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब मिळवला. सात्विक व चिराग यांच्या जेतेपदाच्या रूपाने पहिल्यांदाच भारतीय पुरुष जोडीने बीडब्ल्यूएफ सुपर 500 स्पर्धेचे  जेतेपद मिळवले आहे. भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या चीनच्या ली जून हुई व लियु यु चेन जोडीला 21-19, 18-21, 21-18 असे पराभूत केले. हा सामना जवळपास एक तास दोन मिनिटे चालला. दोन्ही जोडीमधला हा केवळ दुसरा सामना आहे. यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चिनी जोडीने 21-19, 21-18 असा विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने अधिक चुका न करता पहिल्या गेममध्ये 9-6 अशी आघाडी घेतली. चिनी खेळाडूंनी पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले पण, भारतीय जोडीने ब्रेकपर्यंत 11-9 अशी आघाडी घेतली. यानंतर सात्विक व चिराग जोडीने संयम गमावला. त्यामुळे गेम 15-15 असा बरोबरीत आला; पण भारतीय जोडीने जोरदार खेळ करीत पहिला गेम 21-19 असा जिंकत आघाडी घेतली. दुसर्‍या गेममध्ये भारतीय जोडीने 5-2 अशी आघाडी घेतली आणि ही आघाडी पुढे वाढवत नेत 11-9 अशी केली. यावेळी चीनच्या जोडीने पुनरागमन करत गेम 14-14 असा बरोबरीत आणला. यानंतर त्यांनी सलग गुणांची कमाई करीत 21-18 असा गेम जिंकत सामना बरोबरीत आणला. त्यामुळे आणखीन चुरस निर्माण झाली. चीनच्या जोडीने तिसर्‍या गेमला जोरदार सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीलाच 5-2 अशी आघाडी घेतली; पण भारतीय जोडीने जोरदार कामगिरी करीत सामन्यात पुनरागमन केले व गेम 14-14 असा बरोबरीत आणला. यानंतर सात्विक व चिराग जोडीने चमक दाखवत गेम 21-18 असा आपल्या नावे करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here