खोरनिनकोमध्ये घरांवर कोसळला डोंगर

0

लांजा : मुसळधार पावसाने तालुक्यातील खोरनिनको येथील श्रीसाईनगर येथील दोन घरांवर लगतचा डोंगर कोसळल्याने ही दोन्ही घरे जमीनदोस्त झाली. या घरात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली. सोमवारी पहाटेच्या काळोखात हा डोंगराचा काही भाग कोसळला. या दोन्ही घरांचे मिळून नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले. या श्रीसाईनगर या पुनर्वसित 23 घरांपैकी पाच घरांना अजूूनही या धोकादायक डोंगराचा धोका कायम असून या पाचही घरांतील लोकांची खोरनिनको जिल्हा परिषद मराठी शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. खोरनिनको गावातील मुचकुंदी धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 23 कुटुंबांनी या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मोकळ्या जागेत स्वेच्छा पुनर्वसन घेतले होते. यामधील अनुसया रामचंद्र कदम आणि जयवंत नारायण माजळकर या दोघांची घरे या कोसळलेल्या डोंगराच्या दरडीखाली गाडली गेली. या जमीनदोस्त झालेल्या दोन घरांपैकी जयवंत माजळकर यांचे पूर्ण कुटुंब मुंबईत वास्तव्याला असल्याने हे घर बंद होते. तर अनुसया कदम यांच्या घरातील सर्व माणसे मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्ताने असतात. केवळ अनुसया या 75 वर्षांच्या आजी घरात एकट्या राहत होत्या. रविवारी त्या आजारी पडल्याने वाडीतील एका शेजारच्या घरात त्या रात्रीपुरत्या राहण्यासाठी गेल्या होत्या. सुदैवाने त्यांचे आजारपण त्यांना या अनर्थापासून वाचवू शकले. केवळ माणसे मुंबईत असल्याने जीवितहानी टळली. या घटनेत अनुसया कदम यांचे घराचे 6 लाख 29 हजार रुपयांचे पुर्णतः तर जयवंत माजळकर यांच्या घराचे 2 लाख 70 हजार इतके नुकसान झाले.

         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here