रत्नागिरी: विविध गावांमध्ये आलेल्या पुरामुळे १६ गावांमध्ये ६०९ कुटुंबे बाधित

0

रत्नागिरी : तालुक्यात विविध गावांमध्ये आलेल्या पुरामुळे १६ महसूल गावांमधील ६०९ कुटुंबे बाधित झाली असून ५५३ कुटुंबांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांना लवकरच शासकीय निकषानुसार आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिली. गेल्या काही दिवसांत सलग झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील १६ गावांना पुराचा फटका बसला. या पूरग्रस्त गावांमधील ६०९ कुटुंबे बाधित झाली आहेत. चांदेराई, सोमेश्वर, हरचेरी, गावडे आंबेरे या गावांमधील बाधित कुटुंबांची संख्या अधिक आहे. मंगळवारी पाऊस कमी होताच, ज्या गावांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये घुसले होते, त्या घरांमध्ये तहसीलदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके पाठवून त्या घरांचे पंचनामे करण्यात आले. पूरग्रस्त अशा १६ गावांमधील बाधित असलेल्या ६०९ कुटुंबांपैकी ५५३ कुटुंबांचे पंचनामे या विशेष पथकाने पूर्ण केले आहेत. शासकीय निकषानुसार पात्र ठरणा-या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here