जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ११७ प्राथमिक शाळांना फटका

0

रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील ११७ प्राथमिक शाळांना याचा फटका बसला आहे. या शाळांचे एकूण २ कोटी ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस पावसाने राज्यात हाहाकार माजवला होता. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. यामुळे अनेक जण सध्या बेघर झाले आहेत. जिल्ह्यात चिपळूण, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी पूरपरिस्थिती होती. या अतिवृष्टीचा जि. प.च्या प्राथमिक शाळांनाही फटका बसला आहे. एकूण ११७ शाळांचे यामध्ये नुकसान झाले आहे. काही शाळांमध्ये पाणी भरून साहित्याचे, काही शाळांच्या इमारतीवर झाडे पडून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान खेड व राजापूर तालुक्यात झाले आहे. खेड तालुक्यात २४ शाळांचे ९० लाख ३७ हजार, राजापुरातील २५ शाळांचे ५३ लाख, लांजातील ९ शाळांचे ३२ लाख ८५ हजार, संगमेश्वरातील १३ शाळांचे २ लाख ९४ हजार, दापोलीतील ४ शाळांचे ८ लाख २६ हजार, गहागरमधील ७ शाळांचे ३ लाख १५ हजार, चिपळुणातील १६ शाळांचे २७ लाख ७० हजार, रत्नागिरीतील ११ शाळांचे २० लाख ५७ हजार, मंडणगडातील ५ शाळांचे ४ लाख ८० हजार असे एकूण २ कोटी ३८ लाख रुपयांचे नुकसान झाले. राज्यात शिक्षण विभागाकडून पूरबाधित शाळांना ५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तशी घोषणा शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शाळांना यातील निधी मिळणार आहे. ही रक्कम थेट शाळेच्या खात्यात जमा होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here