कोकणातील पहिल्या ‘फॉरेन्सीक लॅबचे’ उद्या उद्घाटन

0

रत्नागिरी : किचकट गुन्हे प्रकरणात गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी बहुमुल्य भूमिका बजाविणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या रत्नागिरीतील पहिल्याच ‘लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रगोशाळा’ (फॉरेन्सीक लॅब) चे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते १६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. ___ अलिकडच्या काळामध्ये गुन्हेगारांकडून गुन्हे करताना अत्याधुनिक सामुग्री व पद्धतीचा वापर करण्यात येतो. अशावेळी तपास पध्दतीत सुध्दा बदल अपेक्षित असतो. मुद्देमालावर रासायनिक विश्लेषण करुन सामाजिक दृष्टीकोनातून तपास यंत्रणांना आणि पयार्याने न्यायदान यंत्रणेला महत्वाची वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी अशा फॉरेन्सीक लॅब महत्वाची भूमिका बजावत असतात. वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये समाजात घडणाऱ्या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालावर शास्त्रीय पद्धतीने विश्लेषणाचे कार्य केले जाते. सद्यस्थितीत मुंबई येथे मुख्य प्रयोगशाळा असून नागपुर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर अशा ७ प्रयोगशाळा कार्यारत आहे. २४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार ठाणे, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापुर व धुळे या ५ लघू प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चंद्रपूर येथील प्रयोगशाळा सुरू झाली असून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठीची प्रयोगशाव्य १६ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या अगोदर या दोन्ही जिल्हयातील गुन्ह्यातील मुद्देमाल पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत होता. ही न्यायशाळा सुरू होताच विषशास्त्र व जीवशास्त्र विभागाच्या मुद्देमालाची तपासणी या ठिकाणी करणे शक्य होणार आहे. या प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, न्यायिक व तांत्रिक महासंचालक हेमंत नगराळे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉ. कृ. वि. कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here