जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचे आमिष; लाखाचा चुना

0

कणकवली : जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून 1 लाख 44 हजारांची रक्‍कम उकळली आणि फिर्यादीने तगादा लावल्यानंतर त्यातील 44 हजारांची रक्‍कम बँक खात्यावर जमा केली. मात्र, उर्वरित 1 लाखाला चुना लावल्याप्रकरणी श्रीकृष्ण श्यामसुंदर कुडतरकर (रा.तोंडवली) याच्याविरुद्ध फसवणूक झालेला तरुण विशाल श्रीधर शिरसाट (वय 29, शिवडाव-चिंचाळवाडी) याने कणकवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून श्रीकृष्ण कुडतरकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कुडाळ येथील एका महिलेला असेच नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना 1 मे ते 25 मे 2019 या कालावधीत घडली. विशाल शिरसाट याने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 1 मे रोजी तोंडवली येथील श्रीकृष्ण कुडतरकर याने त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस लावतो, असे सांगून 2 मे रोजी 60 हजारांची मागणी केली. त्याच दिवशी विशाल शिरसाट याने त्याच्या बँक अकाऊंटवर ही रक्‍कम भरली. त्यानंतर 4 मे रोजी श्रीकृष्ण कुडतरकर याने 70 हजार रुपये अकाऊंटवर भरण्यास सांगितले. विशाल शिरसाट याने 69 हजार रुपये त्याच्या अकाऊंटवर भरले. त्यानंतर 25 मे रोजी कॉल काढण्यासाठी आणखी 14 हजार रुपयांची मागणी त्याने केली. नोकरीच्या आशेने विशाल शिरसाट याने एका ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरकडे ही रक्‍कम पाठवून दिली, तरीही कॉल न आल्याने विशाल शिरसाट याने तोंडवली येथील श्रीकृष्ण कुडतरकर याच्या घरी जाऊन चौकशी केली, त्यावेळी तो घरात नव्हता; मात्र फोनवरून त्याने त्याच्याशी संपर्क साधला आणि अद्याप नोकरीचा कॉल का आला नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी थातूरमातूर उत्तर देऊन श्रीकृष्ण कुडतरकर याने पैसे परत देण्याची ग्वाही दिली आणि विशाल शिरसाट याच्या बँक अकाऊंटवर 29 मे रोजी 44 हजारांची रक्कम भरली. उर्वरीत पैसे चार-पाच दिवसात देतो असे सांगितले. मात्र, नंतर त्याचा फोन स्वीच ऑफ होता. दरम्यान, जुलै महिन्यात कुडाळ येथील महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीकृष्ण कुडतरकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी वृत्तपत्रात वाचून विशाल शिरसाट याने कणकवली पोलिसात आपलीही फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार श्रीकृष्ण कुडतरकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here