अतिवृष्टीग्रस्त कोकणासाठी ३ हजार कोटींची मागणी

0

कुडाळ : अतिवृष्टीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रस्ते उद्ध्वस्त झाले. पिण्याच्या पाण्याच्या योजनांना फटका  झाला. भातशेती कुजली. शेती-बागायतींची नापिकी झाली. कोकणातील ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता शासनाने कोकणासाठी भरघोस आर्थिक सहकार्य करावे. सर्व शेतकरी व बागायतदारांचे शेती कर्ज माफ करावे तसेच या आपत्तीतून कोकणवासीयांना सावरण्यासाठी किमान 3 हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी,  अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, सचिव मिलिंद नार्वेकर व आ. प्रसाद लाड यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक डोंगर खचून गावांना धोका निर्माण झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांतील नद्यांना महापूर आल्याने नद्यांच्या किनारी असलेल्या शेती व बागायतीमध्ये दहा ते बारा दिवस पाणी साचून राहिल्याने भातशेती कुजून गेली.परिणामी शेतकर्‍यांचा या वर्षीचा हंगाम पूर्ण पणे नष्ट झाला आहे. सिंधुदुर्गात जवळपास 11 हजार हेक्टर व रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण व राजापूर परिसरातील 6 हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेती कुजून गेली असुन आता दुबार पेरणी शक्य नाही. त्यामुळे त्या शेतकर्‍यांना वर्षभर धान्य पुरवठा करून आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरात शेकडो रस्ते वाहून गेल असून रस्त्यावरील काही मोर्‍या, कॉजवे, पूलही वाहून गेले आहेत. परिणामी वाहतूक बंद होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण  भागातील अवस्था तर दयनीय आहे. पुराच्या पाण्यामुळे विहीर व नळपाणी योजना निकामी झाल्या असून अनेक विहिरींमध्ये गाळ भरला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. नद्यांनी प्रवाह बदलल्यामुळे लगतच्या शेती बागायती वाहून गेल्या आहेत. त्याठिकाणी नद्यांमधील गाळ काढणे, प्रतिबंधक बंधारे बांधणे आवश्यक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील डोंगरांना भेगा पडल्या. याची भूगर्भ व शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून गावांचे पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. एकंदरीत अतिवृष्टीमुळे कोकणातील परिस्थिती गंभीर असून परिस्थितीनिवारणासाठी कोकणाला किमान ती हजार कोटी रुपयांचे  आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी या पदाधिकार्‍यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here