दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानाचे नाव होणार ‘अरुण जेटली’ स्टेडियम

0

नवी दिल्ली : दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए)ने प्रसिद्ध फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांचे नुकतेच निधन झाले. जेटली यांनी डीडीसीएचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष म्हणून काम पाहीले होते. स्टेडियमचे नाव बदलण्याचा कार्यक्रम पुढच्या महीन्यातील १२ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. याच दिवशी स्टेडियमच्या एका स्टँडचे नाव भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाने ठेवण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे हा सोहळा होणार आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू हे ही सहभागी होणार असल्याची अशी माहिती ‘डीडीसीए’ने ट्वीटरवर दिली आहे. भाजप खासदार आणि भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही दिल्लीतील यमुना क्रीडा संकुलाचे नाव बदलून त्यास दिवंगत अरुण जेटली यांचे नाव देण्याची मागणी केली होती. याबाबत त्याने दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहून विनंती केली होती. जेटली यांच्या निधनानंतर अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला होता. विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाच्या खेळाडूंनी हाताला काळी फित बांधून अरुण जेटली यांना आदरांजली अर्पण केली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here