सिंधू : माझे सुवर्णपदक हे टीका करणार्‍यांना उत्तर

0

बासेल (स्वित्झर्लंड) : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने आपला विजय हे टीकाकारांना उत्तर असल्याचे म्हणाली. गेल्या दोन विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत किताब न जिंकण्यामुळे होणार्‍या टीकेमुळे मी नाराज व दु:खी होते. मी माझ्या रॅकेटने सर्व टीकाकारांना उत्तर दिले आहे, असे सिंधू म्हणाली. जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध किताब जिंकल्यानंतर जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) अधिकृत संकेतस्थळावर सिंधू म्हणाली की, मला टीकाकारांना फक्त रॅकेटने उत्तर द्यायचे होते. गेल्या वर्षी मी नाराज व दु:खी होते; पण मी माझा स्वाभाविक खेळ सुरू केला. सर्वांना मी यावेळी जेतेपद मिळवावे अशी इच्छा होती. रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकानंतर माझ्याकडून अपेक्षा होत्या. मी जेव्हा स्पर्धेला जायची तेव्हा सर्वांना सुवर्णपदकाच्या अपेक्षा असायच्या. यावेळी इतर कोणाचाही विचार न करता मी स्वत:साठी खेळण्याचा विचार केला. कारण मी इतरांबाबत विचार केल्यास माझ्यावर दबाव निर्माण व्हायचा. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर टोकियो ऑलिम्पिक – 2020 बाबत बोलताना सिंधू म्हणाली की, ऑलिम्पिकला फार वेळ शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे घाई करून चालणार नाही. ऑलिम्पिक क्वालिफिकेशन सुरू आहे याची जाणीव मला आहे; पण सध्या या कामगिरीचा आनंद मला घ्यायचा आहे व मी कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here