सिंधुदुर्गातील गणेशोत्सवासाठी पोलिसांसह यंत्रणा अ‍ॅलर्ट

0

ओरोस : गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात वाढणारी वाहतूक व चाकरमान्यांची वर्दळ लक्षात घेऊन पोलिस विभागातर्फे जिल्ह्यात येणार्‍या महत्त्वाच्या मार्गांवर 22 ठिकाणी वाहन तपासणी केंद्रे व 7 तंबू कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यासाठी 26 पोलिस अधिकारी, 138 कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत मनाई आदेश जारी ठेवण्यात आला असून ध्वनिक्षेपकाचा गैरवापर झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. काही चाकरमानी स्वतःचे वाहने घेऊन येतात. त्याचबरोबर रेल्वे, जादा एसटी, आरामबस याद्वारे येतात. यामुळे जिल्ह्यात वाहतूक व प्रवाशांची वर्दळ वाढलेली असते.  अशा स्थितीत काही गैरप्रकार होण्याबरोबरच वाहतूक कोंडी व अपघात यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी तसेच गौरी-गणपती उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस व व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अ‍ॅलर्ट झाले आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहन तपासणी नाके उभारून काही ठिकाणी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. वाहनचालक व प्रवाशांच्या मदतीसाठी क्रेन, रुग्णवाहिका, आरोग्यपथके तैनात ठेवण्यात आली आहेत. पेट्रोलिंगची 12 पथके व 26 मोटारसायकल यांच्या माध्यमातून जिल्हाभरात पोलिस गस्त घालणार आहेत. त्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक 2, पोलिस अधिकारी 26, पोलिस कर्मचारी 79, वाहतूक पोलिस 29 व  होमगार्ड 30 असा  पोलिस बंदोबस्त खारेपाटण ते इन्सुली या महामार्गावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, सात ठिकाणी तंबू उभारण्यात आले  आहेत. गणेशोत्सव काळात महामार्गावर पोलिस व्यवस्थेबरोबरच प्रत्येक पोलिस स्टेशनस्तरावर रेल्वे, बाजार, एसटी स्टँड आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीने प्रत्येक पोलिस स्टेशनला सूचना दिली असून दिवस-रात्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here