वेताळबांबर्डे-तेलीवाडीत दिलीप बिल्डकॉन कंपनीने डोंगर पोखरल्याने घरांना धोका

0

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत मातीसाठी दिलीप बिल्डकॉन कंपनी या हायवे ठेकेदार कंपनीने वेताळबांबर्डे-तेलीवाडी येथील डोंगर पोखरल्याने तेथे अतिवृष्टीत भूस्खलन होऊन दहा ते पंधरा घरांना धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी पुणे येथील केंद्रीय भू-सर्व्हेक्षण पथकाने या खचलेल्या डोंगराची पाहणी केली.त्यानंतर सरंबळ येथील भूस्खलन झालेल्या डोंगराची पाहणी या पथकाने केली.भूस्खलनाबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे या पथकाने सांगितले. कुडाळसह वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातही भूस्खलन झालेल्या गावांना हे पथक भेटी देऊन सर्व्हे करणार आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले. डोंगरही खचण्याचे प्रकार झाले.लोकवस्ती लगतच्या डोंगरामध्ये भूस्खलन होऊन नजीकच्या नागरिकांना धोका निर्माण झाला होता.प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. त्यानंतर भूगर्भ शास्त्रज्ञांनी या गावांची पाहणी केली.त्याचा अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर शासनाने केंद्रीय भू सर्व्हेक्षण पथकाला या गावांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या.कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे-तेलीवाडी व सरंबळ देऊळवाडी, सावंतवाडीतील शिरशिंगे-गोठवेवाडी व असनिये-कणेवाडी, दोडामार्गमधील झोळंबे-दापटेवाडी आणि वेंगुर्लेतील तुळस पलतड-वेशीवाडी व पाल कांथरवाडी या गावांमध्ये भूस्खलन झालेल्या भागाचा सर्व्हे करण्यासाठी पुणे येथील पथक सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. शनिवारी या पथकाने कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे-तेलीवाडी व सरंबळ-देऊळवाडी येथील भूस्खलन झालेल्या डोंगराची पाहणी केली.वेताळबांबर्डेतील पाहणीवेळी या पथकातील वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रमिता दासरवार व जगदीश हिंदयार यांच्यासह जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर, कुडाळचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, मंडळ अधिकारी व्ही.एम.पाटील, वेताळबांबर्डे तलाठी सौ.सावंत, माजी सरपंच दिलीप तिवरेकर आदी उपस्थित होते. वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रमिता दासरवार व जगदीश हिंदयार यांनी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांच्याकडून भूस्खलनाची माहिती घेतली.पाहणीवेळी हायवे ठेकेदार कंपनी प्रशासनाने तेलीवाडी येथे लोकवस्ती लगतचा डोंगर महामार्ग चौपदरीकरणांतर्गत भरावासाठी पोखरून मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याने येथे डोंगर खचल्याचे समोर आले. तेथे पावसाचे पाणी वाहण्याचा मार्ग मोकळा करावा यांसह आवश्यक सूचना भू वैज्ञानिकांनी यावेळी केल्या. वेताळ बांबर्डेनंतर सरंबळ-देऊळवाडी येथे या पथकाने भेट दिली. या भूस्खलनाबाबतचा अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे या पथकातील भू वैज्ञानिकांनी सांगितले. तसेच भूस्खलन ठिकाणी कोणताही धोका नाही. मात्र नागरिकांनी अलर्ट रहावे,असे आवाहन तहसीलदार मच्छींद्र सुकटे यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here