डॉक्टर अथवा रुग्णालयावर हल्ला केल्यास दहा वर्षे तुरुंगवास

0

नवी दिल्ली : डॉक्टर अथवा रुग्णालयावर हल्ला केल्यास दोषींना दहा वर्षांची शिक्षा आणि दहा लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसा प्रस्ताव तयार केला असून हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भात विधेयक आणले जाणार आहे. डॉक्टर आणि रुग्णालयावर हल्ला करण्यासारख्या हिंसक घटना अलीकडच्या काळात घडत आहेत. अशा हिंसक प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवा प्रस्ताव तयार केला आहे.   पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडून तपास: डॉक्टर आणि रुग्णालयावरील हल्ल्याचा तपास करण्याचे अधिकार जिल्हा पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांना असतील, अशीही तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ले आणि रुग्णालयाच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या संघटनांकडून देशव्यापी संपही पुकारण्यात आले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन सरकारकडे सातत्याने करीत आहे. या पार्श्वभूमीवर हे विधेयक आणले जाणार आहे. डॉक्टर, परिचारिका यांना 5 लाखांपर्यंत भरपाई : हल्ल्यामध्ये डॉक्टर, परिचारिका अथवा रुग्णालयातील कर्मचारी जखमी झाल्यास किमान तीन वर्षे ते कमाल दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. तसेच दोन लाखांपासून दहा लाखांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात येणार आहे. मालमत्तेचे नुकसान केल्यास बाजारभावापेक्षा दुप्पट भरपाई द्यावी लागेल. रुग्णालयावर हल्ला केल्यानंतर कुणी जखमी झाले नसले तरी किमान सहा महिने ते पाच वर्षांच्या शिक्षेची आणि 50 हजार ते 5 लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूदही प्रस्तावित विधेयकात केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here