मुंबईच्या शिवसेनाभवनात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा

0

मुंबई – मुंबईच्या शिवसेनाभवनात आज, मंगळवारपासूनच निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या तोंडी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी शहरांसाठी विभागणी करून मुलाखती घेणाऱ्या नेत्यांचीही वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे सेनेने विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरु केल्याचेच यातून निष्पन्न होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी काही दिवसात पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सव संपताच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचे सांगितले जात असून इच्छुक उमेदवारांची जागा मिळवण्यासाठी धडपडदेखील सुरु झाली आहे.

एकीकडे दुसऱ्या पक्षातील नेत्यांची ये-जा सुरु असताना काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीकरता इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेण्याचे योजले आहे.

असा आहे मुलाखतींचा कार्यक्रम –

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १० सप्टेंबर रोजी होणार असून कोल्हापूर व सोलापूरसाठी ११ सप्टेंबरचा दिवस ठरवण्यात आला आहे. या दोनही दिवसांत विश्वनाथ नेरूरकर, विजय कदम, डॉ. मनिषा कायंदे, खा. श्रीकांत शिंदे, प्रकाश फातर्फेकर, अमोल कीर्तीकर, वरूण सरदेसाई हे मुलाखतकार असणार आहेत.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, अकोला, वाशिम या विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १३ सप्टेंबर रोजी होणार असून नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसाठी १४ सप्टेंबरला मुलाखती होणार आहेत. यांच्या मुलाखती विनायक राऊत, विनोद घोसाळकर, राहुल शेवाळे, अंबादास दानवे, डॉ. भारती बावदाणे, अमोल कीर्तीकर, वरूण सरदेसाई घेणार आहेत.

मराठवाडामधील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १५ सप्टेंबर रोजी तर नांदेड, हिंगोल, लातूर धाराशिवसाठी १६ सप्टेंबर रोजी मुलाखती होणार आहेत. या मुलाखती उदय सामंत, खासदार, धैर्यशील माने, सुनील प्रभू अजय चौधरी, शुभा राऊळ, अमोल कीर्तीकर, वरूण सरदेसाई घेणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या विभागातील उमेदवारांच्या मुलाखती १७ सप्टेंबर रोजी तर जळगाव आणि नगरमधील इच्छुकांच्या मुलाखती १८ सप्टेंबरला होणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील, अरविंद नेरकर, हेमंत पाटील, डॉ. दीपक सावंत, किशोरी पेडणेकर, अमोल कीर्तीकर, वरूण सरदेसाई यांच्यावर मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोकणमधील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागांकरता १९ सप्टेंबर रोजी मुलाखती होणार असून ठाणे आणि पालघर येथील इच्छुकांच्या २० सप्टेंबरला मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखती रविंद्र मिर्लेकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार हेमंत गोडसे, अनिल कदम, शीतल म्हात्रे, अमोल कीर्तीकर हे नेते घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here