मिऱ्या बंधाऱ्याच्या दहा-पंधरा वर्षे रखडलेल्या कामावर होणार १९० कोटिंचा खर्च

0

रत्नागिरी : गेली दहा-पंधरा वर्षे रखडलेला मिऱ्या बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असून १९० कोटी रुपये खर्च करुन मरिन ड्राईव्हच्या पध्दतीने हा धूपप्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यात येणार आहे. हे काम दर्जेदार व्हावे, यासाठी मिऱ्या परिसरातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ लक्ष ठेवणार असून, काम सुरु असताना सीसीटीव्ही बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मिऱ्या ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन पत्तन अभियंत्यांनी करुन ग्रामस्थांचे समाधान केले. मिऱ्या येथील दत्त मंदिरामध्ये शनिवारी बैठक पार पडली.यावेळी मिऱ्या परिसरातील सर्व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा साडेतीन किलोमीटरचा आहे. या बंधाऱ्यासाठी शासनाने १९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपये पत्तन विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. या बंधाऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी मिऱ्यावासीयांनी कंबर कसली आहे. पावसाळ्यात दरवर्षी समुद्राच्या अजस्त्र लाटांमुळे बंधाऱ्याची धूप होते. बंधाऱ्याला भगदाड पडून पाणी लोकवस्तीत शिरण्याची भीती निर्माण होते. दर पावसाळ्यात सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली जाते. मात्र, लाखोंचा हा खर्च पाण्यात जातो. कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी शासनाने मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बंधारा मजबूत व्हावा, यासाठी मोठे दगड वाळूखाली टाकले जाणार आहेत. समुद्राच्या लाटांमुळे बंधाऱ्याचे दगड वाहून जाऊ नयेत, यासाठी दोन टनाचे टेट्रापॉड टाकण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दगडांवर काँक्रीटचा ४ मीटरचा रस्ता बनविण्यात येणार आहे. याचा वापर पर्यटनासाठी होऊ शकतो. त्याचा उपयोग स्थानिक ग्रामस्थांना पर्यटन व्यवसायाच्या रुपाने होईल. बंधाऱ्याला वापरणारे दगड चांगल्या दर्जाचे असावेत, अशी मागणी बैठकीत ग्रामस्थांनी केली. कामावर देखरेख ठेवण्यासाठी क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी आणि पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. साडेतीन किलोमीटरच्या परिसरात सहा वाड्या येतात. त्यात्या वाडीतील ग्रामस्थ या कामावर लक्ष ठेवणार आहेत. त्यांना चुकीचे काय आढळले तर तेच याला वाचा फोडतील. त्याचबरोबर होड्यांची नेआण करणे किंवा गणेश विसर्जनासाठी ओटे, पायऱ्या यासाठीच्या सूचना ग्रामस्थांनी कराव्यात, असे आवाहन अधिकाऱ्यांनी यावेळी केले. कामावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याची सूचना ग्रामस्थांनीकेली.सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्यक्षात काम सुरु करण्यात आचारसंहितेमुळे विलंब होणार नाही, याची काळजी पत्तन विभागाकडून घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनीही यावेळी समाधान व्यक्त केले.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here