दिल्‍लीसह उत्‍तर भारताला भूकंपाचा तीव्र झटका

0

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्‍लीसह उत्‍तर भारताला मंगळवारी सायंकाळी ४.३२ वाजता भूकंपाचा तीव्र झटका बसला. पाकव्याप्‍त काश्मीरमधील न्यू मीरपूर शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि याची तीव्रता ६.३ रिश्टर इतकी होती. भारतातील या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर इतकी होती. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्याला लागून असलेल्या पाकव्याप्‍त काश्मीरमधील मीरपूर शहर व परिसरात या भूकंपामुळे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने भारतात भूकंपामुळे फारशी हानी झालेली नाही. नुकसानीबाबतचे बरेचसे चित्र बुधवारी सकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ४.३२ वाजता तर पाकिस्तानच्या वेळेवर सायंकाळी ४.०१ भूकंप झाला. दिल्‍लीसह हरियाना, पंजाब, जम्मू-काश्मीरमधील बहुतांश भागात हा भूकंप स्पष्टपणे जाणवला. पाकिस्तानातील लाहोर ते इस्लामाबाद शहरांच्या मध्ये न्यू मीरपूर शहर आहे. लाहोरपासून हे शहर १७३ किलोमीटर अंतरावर आहे. दिल्‍लीमध्ये भूकंप जाणवल्यानंतर घर आणि कार्यालयातील लोकांनी सुरक्षित जागी धाव घेतली. दिल्‍लीसह उत्‍तर भारतात काही सेकंदासाठी भूकंप जाणवला. भारतात भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर इतकी होती, असे नॅशनल सेंटर फॉर सेस्मिलॉजीकडून सांगण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी, पूँछ, जम्मू, उधमपूर, रामबन या ठिकाणी भूकंपाची तीव्रता जास्त होती. याशिवाय चंदीगड, अंबाला, पानिपत, अमृतसर, लुधियानासह दिल्‍लीला लागून असलेल्या गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद या शहरांतही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here