युतीच्या अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री दिल्लीत

0

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत भाजपची कोअर ग्रुपची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन उपस्थित राहिले आहेत. या बैठकीत भाजप- शिवसेना युतीबाबत बोलणी करण्यात येत आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे समजते. यामुळे युतीचा निर्णय रविवार जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप- शिवसेना युतीचा निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल युती तर होणारच, असं सांगत युतीबाबत स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्र्यांनीही राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे अनेक वेळा बोलून दाखविले आहे. भाजप-शिवसेना युतीत सर्व काही आलबेल आहे, असे वाटत असताना जादा जागा मिळविण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने युतीत तणाव निर्माण झाला होता. भाजपने शिवसेनेला १२० जागा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, शिवसेनेने आणखी पाच ते सहा जागांची मागणी केली आहे; तर भाजपनेही १२० पेक्षा जास्त जागा देण्यास नकार दिल्याने युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here