खड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा बळी; तरुणाचा जागीच मृत्यू

0

चिपळूण : खड्डेमय झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाने चिपळुणात पाचवा बळी घेतला आहे. शहरातील अभिरूची हॉटेलसमोर एस.टी. बसला ओव्हरटेक करताना दुचाकी खड्यात अडकून झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय तरुणाच्या अंगावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नवाब तुरूप (रा. पवारसाखरी, ता. गुहागर) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २७) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नवाब हा मच्छीचा व्यवसाय करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो कुटुंबाला मदत करतो. त्याच्या ताब्यातील स्कूटी या दुचाकीने तो अभिरूची हॉटेलसमोर एस.टी. बसला ओव्हरटेक करीत असताना महामार्गावरील खड्यामध्ये त्याची दुचाकी अडकली व अज्ञात वाहनाला धडक बसून तो चाकाखाली चिरडला गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना घडताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली. मात्र, त्याचवेळी धडक देणारे वाहन निघून गेल्याचे निदर्शनास आले. या स्कुटीला एसटी बसची धडक बसल्याचे प्रथमदर्शीनी सांगितले.दरम्यान, याच ठिकाणी आणखी तिघांचा अपघाती बळी गेला आहे. यामध्ये माजी नगरसेवक शिरीष काटकर यांचे बंधू राजेश काटकर व एका हॉटेलमधील आचाऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच पंचायत समितीसमोरील खड्ड्यातून दुचाकीवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आजपर्यंत पाच बळी घेतले असून संबंधित कंपनीने याची दखल घेतलेली नाही. ज्यांचा मृत्यू झाला त्यांना महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here