दीपक केसरकर, वैभव नाईक यांच्या उमेदवारीवर सेनेकडून शिक्‍कामोर्तब

0

सिंधुदुर्ग : सावंतवाडी मतदारसंघाचा शिवसेनेचा  उमेदवार  पालकमंत्री दीपक केसरकर हेच असणार, हे निश्‍चित होते. त्यानुसार रविवारी शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत या मतदारसंघासाठी दीपक केसरकर यांचे नाव जाहीर झाले आहे. त्याचबरोबर कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांचेही नाव अपेक्षेनुसार जाहीर झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दोघांनाही पक्षाचा एबी फॉर्म देत त्यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब केलेे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही अधिकृत पक्षाची उमेदवारी जाहीर झालेले केसरकर, वैभव नाईक हे सिंधुदुर्गातील पहिले उमेदवार आहेत. रत्नागिरीतही सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुंबई येथे 29 सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात अपेक्षेप्रमाणे सावंतवाडीतून पालकमंत्री दीपक केसरकर व कुडाळमधून वैभव नाईक यांना उमेदवारी मिळाली आहे. युतीच्या जागावाटपानुसार सावंतवाडी व कुडाळ हे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. या ठिकाणी दीपक केसरकर व वैभव नाईक यांना पक्षातून तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही, यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. केसरकर हे उमेदवारी अर्ज केव्हा दाखल करणार, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, वैभव नाईक हे 2 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास सावंतवाडी मतदारसंघातून आघाडीतर्फे राष्ट्रवादीचा उमेदवार असण्याची शक्यता आहे. यासाठी दीपक केसरकर यांचे ऐकेकाळचे जीवलग मित्र व सावंतवाडीचे विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर व वेंगुर्लेतील सहकार क्षेत्रातील नेते एम. के. गावडे यांचे नाव आघाडीवर आहे. तर पक्ष निरीक्षक अर्चना घारे- परब यांचेही नाव चर्चेत आहे. दुसरीकडे भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. युती न झाल्यास या मतदारसंघातून भाजपचे चिटणीस राजन तेली यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. मात्र युती झाल्यास तेली काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. याबरोबरच महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भूमिकाही लक्षवेधी ठरणार आहे. श्री. परब हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, मात्र श्री. परब यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश निश्‍चित होत नसल्याने जिल्ह्यातील राजकीय स्थिती स्पष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीत शिवसेने जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतली आहे. ना. दीपक केसरकर यांनी यापूर्वीच आपला प्रचार सुरु केला आहे.  कुडाळ- मालवण मतदारसंघासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. त्यांनीही यापूर्वीच आपला प्रचार सुरू केला आहे. या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तसेच भाजपकडेही तुल्यबळ उमेदवार नाहीत. मात्र नारायण राणेंचा भाजप प्रवेश झाल्यास या मतदारसंघाचे राजकीय चित्र बदलणार आहे. मध्यंतरी या मतदारसंघातून स्वत: नारायण राणे तसेच कणकवलीचे आमदार नितेश राणे निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. खुद्द आ.नितेश राणे यांनीही असेच वक्तव्य केले होते. यामुळे कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक यांचा प्रतिस्पर्धी कोण असणार? याची उत्सुकता आहे. सध्या तरी आ. नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतली असून कुडाळ व मालवण या दोन्ही तालुक्यात त्यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. तर कणकवली मतदारसंघाचा शिवसेना उमेदवार युती व नारायण राणेंचा भाजपा प्रवेश, या दोन बाबींवर अवलंबून  आहे. युतीच्या जागावाटवात कणकवली मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here