देवडे गावची आकांक्षा कदम बनली राष्ट्रीय कॅरमपटू

0

देवरुख : लहानपणापासून कॅरम खेळण्याच्या असलेल्या आवडीमुळेच आज ती राष्ट्रीय कॅरमपटू बनली आहे. आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेकरीता जिल्हयातून सहभागी होणारी तिसरी स्पर्धक म्हणून संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम हीची निवड झाली आहे. अत्यंत कमी वयामध्ये आकांक्षाने यशाला गवसणी घालत हे यश संपादन केले असून श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता गुरूवारी ती रवाना झाली आहे. आंकाक्षा ही साखरपानजीकच्या देवडे गावातील रहिवासी असन सध्या ती रत्नागिरी येथील शिर्के माध्यमिक विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत आहे. आकांक्षा हीचा मामा संदीप देवरूखकर हे राष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू असल्याने त्यांची छाप तिच्यावर पडली. लहानपणापासून कॅरम खेळताना कॅरमचे बाळकडू ती मामाकडून घेऊ लागली. कॅरम खेळण्यामध्ये तरबेज होत तिने अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवले आहे. राष्ट्रीय कॅरमपटू म्हणून आपला नावलौकीक देखील आकांक्षाने मिळविला असून तालुक्याबरोबरच जिल्हयाचे नाव देखील उज्ज्वल केले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आकांक्षाची निवड झाली असून ६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर कालावधीत श्रीलंका इंडो मालदीव येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेकरीता तिची भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. १४ वर्षाची असलेली आकांक्षा ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी पहिलीच लहान खेळाडू ठरली आहे. तर रत्नागिरी जिल्हयातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता भाग घेणारी आकांक्षा ही तिसरी कॅरमपटू ठरली आहे. याआधी आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरूखकर, रियाज अकबर अली या दोघांची आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत निवड झाली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आकांक्षाने देखील आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. श्रीलंकेला जाण्याकरीता ती गुरूवारी सायंकाळी मुंबई येथून विमानाने रवाना झाली. आतापर्यंत आकांक्षाने ४ राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असून या चार स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य व १ कास्य पदकाची कमाई केली आहे. आकांक्षा हीला संदीप देवरूखकर, महेश देवरूखकर तसेच रवि कॅरम हाऊस, रत्नागिरी कॅरम असोसिएशन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आकांक्षाच्या निवडीबद्दल तालुकावासीयांनी तिचे अभिनंदन केले आहे. आकांक्षाच्या कामगिरीमुळे ती अनेकांना आदर्शवत खेळाडू ठरणार आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here