गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढत उदय सामंत यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

0

रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विराट जनसमुदायाने आज गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. या अफाट गर्दीकडे बघून अनेकांनी तोंडात बोटे घातली. महायुतीचे सर्वच पक्षांचे पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संखेने आले होते. त्यामुळे हा परिसर भगवा मय झाला होता, आमदार उदय सामंत यांच्या प्रेमाखातर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते व स्वप्नील बांदोडकर यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावून आपल्या गायनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. या मेळाव्यात उपस्थित जनसागराने अबकी बार एक लाख पार अशा घोषणा देऊन उदय सामंत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. रत्नागिरीच्या इतिहास हि रेकॉर्ड ब्रेक गर्दी ठरली.

अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या उपस्थितीने जोश भरला

आमदार उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या मेळाव्यात अचानक उपस्थित झालेले महराष्ट्राचे आघाडीचे गायक स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी आपल्या सुमधुर आवाजाने जोश भरला. त्यांनी म्हटलेल्या शिवसेनेच्या गीताने तर भगव्या जनसागराच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आमदार उदय सामंत यांच्याप्रती असणाऱ्या प्रेमापोटी आम्ही सर्व कामे बाजूला ठेऊन आज रत्नागिरीत उपस्थित राहिलो असे त्यांनी भर सभेत सांगताच टाळ्यांचा जल्लोष झाला. या दोघांच्या उपस्थितीने रणरणत्या उन्हात देखील जनसागर सुखावला.

महायुतीच्या ताकदीचे आणि मिलाफाचे प्रदर्शन

ज्या कौशल्याने संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिकांची मोट आमदार सामंतांनी बांधली त्याच कौशल्याने रत्नागिरीत युतीची मोट बांधण्यात यशस्वी झाल्याचे चित्र आज झालेल्या महायुतीच्या विराट मेळाव्यात दिसून आले. महायुतीतील बीजेपीसह सर्वच पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी झाडून उपस्थित होते. बीजेपी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या अथक परिश्रमामुळे आजच्या मेळाव्याला जे बीजेपीचे पाठबळ मिळाले त्यामुळेच हा गर्दीचा विक्रम तोडणे शक्य झाले असे अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखवले.

उदय सामंत हे महराष्ट्राचे वैभव : खा. विनायक राऊत

शिवसेनेच्या आज झालेल्या विराट मेळाव्याला खासदार विनायक राऊत यांनी आपल्या तडाखेबाज छोटेखानी भाषणाने अक्षरशः जिंकल. ‘उदय सामंत हे महराष्ट्राचे वैभव आहे’ या राऊतांच्या वाक्याने तर अख्या जनसागराच्या अंगावर रोमांच उभे राहिले. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा गडगडाट केला. महायुतीशी टक्कर देण्याचा प्रयत्न करू नका, विरोधकांनी अर्ज भरा मात्र ७ तारखेला माघार घ्या असा सल्ला देखील खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खुमासदार शैलीत विरोधकांना दिला. आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत हे संपूर्ण महराष्ट्रात प्रचंड मतांनी निवडून येणारे पहिले तीन उमेदवार असतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. भविष्यात तुमच्यासारखा कर्तबगार कोकणसम्राट या महराष्ट्रात नाव करेल अशी आशा देखील विनायक राऊत यांनी व्यक्त केली. खा. विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव आहेत. बळासाहेबांच्या कार्यशैलीत घडलेला एक कडवा शिवसैनिक म्हणून उभ्या महराष्ट्रात त्यांची ओळख आहे. म्हणूनच त्यांच्या तोंडून आमदार उदय सामंत यांच्याविषयी निघालेल्या गौरोद्गारांना फार महत्व असल्याचे बोलले जात आहे.

या विराट मेळाव्याला संबोधित केल्यावर उदयजी सामंत मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर येथे आले यावेळी खासदार विनायक राऊत माजी मंत्री रवींद्र माने, सुभाष बने, गणपत कदम, जिल्हा प्रमुख विलास चाळके, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सरचिटणीस मंगेश साळवी, राजू महाडिक, नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, अशोक मयेकर, अॅड विलास पाटणे, मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर सेना व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संखेने  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here