रत्नागिरी ते देवरूख लोकल फेऱ्या बंद कधी होणार?

0

देवरूख : रत्नागिरी ते देवरूख मार्गावरील एसटी महामंडळाच्या फेऱ्या या रत्नागिरी शहरात लोकल केल्या जात असल्याने येथील शहर बससेवेचे आर्थिक नुकसान होत आहे. रत्नागिरी शहर ते खेडशीपर्यंतच्या प्रवाशांची संख्या देवरूख गाड्यांमध्ये जास्त असल्याने देवरूखच्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेशच मिळत नाही. त्यामुळे देवरूख गाड्या कोणासाठी? असा संतप्त सवाल व्यक्त होत आहे. रत्नागिरी शहरात शहरी बससेवा सुरू आहे. मात्र या फेऱ्यांचा तिकीट दर दुप्पट आहे. खेडशी, महालक्ष्मी स्टॉप, कारवांचीवाडी, रेल्वेस्टेशन, कुवारबाव येथील प्रवाशांची संख्या देवरूख गाड्यांमध्ये जास्त असते. बहुतांश वेळा लोकल प्रवाशांनीच देवरूख गाडी भरते. शहरी बससेवेचा तिकीट दर दुप्पट असल्याने देवरूख डेपोच्या फेऱ्यांनी शहरातील प्रवासी प्रवास करतात. देवरूख गाडीने प्रवास केल्याने प्रवाशांचे १० रुपये वाचतात, पण त्यामुळे मात्र रत्नागिरी शहर बससेवेचे आर्थिक नुकसान होत आहे. रत्नागिरी शहरातील उत्पन्न देवरूख आगाराला मिळते. परंतु देवरूखला जाणाऱ्या प्रवाशांना मात्र देवरूख गाडीत प्रवेशच मिळत नाही, असे प्रकार अनेकवेळा घडतात. रत्नागिरी डेपोतच देवरूख गाड्या रत्नागिरीतील प्रवाशांनी फुल्ल होतात. त्यामुळे माळनाका, जिल्हा परिषद, मारुती मंदिर, साळवी स्टॉप याठिकाणी अनेकवेळा देवरूख गाड्या थांबत नाहीत. या थांब्यांवर देवरूखला जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात. मात्र देवरूखच्या प्रवाशांसाठी गाड्या थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे कारवांची वाडीच्या पुढे देवरूख गाड्या रिकाम्या धावतात, असे अनेकवेळा दिसून आले आहे.रत्नागिरी शहरात देवरूख फेऱ्या लोकल करू नये यासाठी अनेकवेळा देवरूख आगाराला, रत्नागिरी विभाग नियंत्रकांना प्रवाशांनी निवेदने दिली आहेत. पंचायत समितीच्या सभेत ठराव देखील करण्यात आला आहे. मात्र या समस्येची दखल देवरूख आगार प्रमुख व रत्नगिरीचे विभाग नियंत्रक घेताना दिसत नाहीत.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here