चिपळूणातील रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाची झालीय दुरवस्था

0

चिपळूण : शहरानजीकच्या वालोपे येथील (चिपळूण) रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मुरादपूर-गांधारेश्वर रेल्वेस्थानक मार्गाची दुरवस्था झाली आहे. मुरादपूर येथे नव्याने केलेले डांबरीकरण उखडले असून सर्वत्र खडी पसरल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. वालोपे येथे रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मुरादपूर, गांधारेश्वरकडील मार्ग नजिकचा व सोयीचा ठरतो. या मार्गाने दररोज अनेक प्रवासी ये-जा करीत असतात. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील रहदारी वाढली आहे. नगर परिषदेच्यावतीने मे महिन्यात घाईगडबडीने या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सर्वत्र खडी पसरली आहे. गांधारेश्वर पुलाच्या पलिकडील मार्गही धोकादायक बनला आहे. दरम्यान, हा मार्ग कोणाच्या अखत्यारित आहे या वरून अनेक वर्षे वाद सुरू आहेत. वालोपे ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे व्यवस्थापनाकडे काहींनी या रस्त्यासाठी पाठपुरावाही केला होता. मात्र, सर्वच खात्यांनी हात वर केल्याने या मार्गाची आता दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. हा रस्ता नागरिकांसाठी जवळचा लागतो. त्यामुळे हा रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे. परंतु सध्या या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here