अब की बार ‘ठाकरे सरकार’, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवतीर्थ सज्ज, कोण कोण शपथ घेणार?

0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित राहणार आहेत.

जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने हा शपथविधी रंगणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील. उद्धव ठाकरे शपथ घेण्यापूर्वी शिवरायांच्या पुतळ्याला क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार अर्पण करतील.

शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोरच सहा हजार चौरस फुटांचं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. मंचावर 300 जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे. शिवाजी पार्क परिसरात एक हजार गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात 20 एलईडी लावले गेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीलाही पुष्पआरास करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंसोबत कोण शपथ घेणार?

उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित समजले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच जयंत पाटील आणि छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शपथ घेणार असल्याचं म्हटलं जातं.

निमंत्रितांमध्ये कोण?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना आदित्य ठाकरे यांनी स्वतः दिल्लीला जाऊन निमंत्रण दिलं. सोनिया गांधी उपस्थित राहिल्यास चांगला संदेश जाईल, अशी काँग्रेस नेत्यांची धारणा असल्यामुळे सोनिया गांधी स्वतः शपथविधीला उपस्थित राहण्याची चिन्हं आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उद्धव ठाकरे यांनी फोन करुन आमंत्रित केलं. मोदींनी उद्धव यांना शुभेच्छा देत अभिनंदन केलं. मात्र भाजपकडून कोण उपस्थित राहणार, याची उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं. राज ठाकरेही सहकुटुंब उपस्थित राहून ठाकरे कुटुंबाच्या आनंदसोहळ्यात सहभागी होण्यचाी शक्यता नाकारता येत नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, माजी पंतप्रधान एच. के. देवेगौडा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रमाणे विविध देशांच्या राजदूतांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. शेतकरी ते वारकरी, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही सोहळ्यासाठी आमंत्रित आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here