लोटे एमआयडीसीमध्ये रेल्वेचे कोच बनविण्याचा कारखाना उभारणीचे काम सुरू

0

अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये रेल्वेचे कोच बनविण्याचा कारखाना उभारणीचे काम सुरू झाले आहे. कारखाना उभारणीचे काम रेल्वेकडून टाटा कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये प्रदूषणविरहित पहिल्या कारखान्याला सुरवात झाली आहे. लोटे परिसरातील दाभिळ, आयनी, मेटे, असगिणी आदी गावातील 650 हेक्‍टर क्षेत्र अतिरिक्त लोटे एमआयडीसीसाठी संपादित झाले आहे. यातील 89 हेक्‍टर क्षेत्रावर रेल्वेचे कोच बनविण्याचा कारखाना उभारला जाणार आहे. अतिरिक्त लोटे एमआयडीसीतील 11 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. यातील रेल्वेचा पहिलाच कारखाना सुरू झाला आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये रेल्वेचे कोच बनविण्याच्या कारखाना उभारणीसाठी मंजुरी दिली. पाचशे कोटीच्या या प्रकल्पासाठी दोन वर्षापूर्वी भूमिपूजन झाले. कोकण रेल्वे, भारतीय रेल्वे आणि एमआयडीसी यांच्यातील समन्वय साधून आवश्‍यक त्या परवानग्या आणि निविदा प्रक्रियांमुळे दोन वर्ष कारखाना उभारणीचे काम संथ गतीने सुरू होते. सद्यस्थितीत प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला गती मिळाली आहे. प्रकल्प उभारणीसाठी रेल्वेकडून ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये टाटा कंपनीने बाजी मारली. कामाचे आदेश मिळाल्यानंतर टाटा कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी येथे नियुक्त करण्यात आले आहे. संपादित जागेला संरक्षण भिंत टाकून आवश्‍यक तिथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. डोंगराळ जागेचे सपाटीकरण करून बांधकामासाठी खोदाई करण्यात आली आहे. रेल्वेकडून नुकतेच मातीचे परिक्षणही करण्यात आले आहे. लवकरच वेगाने कामाला सुरवात होणार आहे. 

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here