कडधान्य, डाळी शंभरी पार

0

यावर्षी पावसामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजरात त्याचा तुटवडा जाणवणार हे निश्चित आहे. दिवाळीनंतर बाजारात नवीन अन्नधान्याची आवक सुरू होते. त्यानुसार यावेळी थोड्या उशिराने ही आवक सुरू झाली, मात्र त्यांच्या दरात गेल्या वर्षीच्या मानाने ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे अनेक कडधान्य घाऊक बाजारात शंभर रुपये किलोच्या घरात पोहचले आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहेत. किरकोळ बाजारातही कडधान्य १०० ते १२० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळे मागच्या आठ महिन्यांपासून कांदा, भाजीपाला यांच्या वाढलेल्या दराने त्रस्त झालेल्यांना आता या कडधान्याच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे.

मागच्या तीन-चार वर्षांपूर्वी बाजारात तुरीच्या डाळींनी किलोमागे शंभरी ओलांडली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून रेशन दुकानात स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून दिली, मात्र आताही तशीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे, परंतु स्वस्त दराचे कुणी नाव काढत नाही. त्यामुळे ग्राहकांना महागड्या डाळी आणि कडधान्य खरेदी करावी लागणार, हे स्पष्ट आहे. यावेळी तूरडाळीचे दर काही प्रमाणात कमी असून मूग डाळीने मात्र दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारात तूरडाळ ७० ते ९० रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात ती ८० ते १०० रुपये किलो आहे. तर मूगडाळ मात्र घाऊक बाजारात ८५ ते १०० रुपये किलो झाली आहे आणि किरकोळ बाजारात मूगडाळ ११० ते १२० रुपये किलोच्या घरात पोहचली आहे. अख्खे मूगही घाऊक बाजारात ८० ते १०० रुपये असून किरकोळ बाजारात ९० ते ११० रुपये किलो झाले आहेत. हिच परिस्थिती इतर कडधान्य आणि डाळींच्या बाबतीत झाली आहे. हिरवा वाटाणा ८० ते ११० रुपये किलो, तर पांढरा वाटाणा ६० ते ७० रुपये किलो घाऊक बाजारात झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा १२० ते १२५ रुपये किलोवर पोहोचला आहे. मटकीचे दरही घाऊक बाजारात ७५ ते ९५ रुपये किलो झाले आहेत. किरकोळमध्ये हे दर ८५ ते १०० रुपये किलो आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here