गारठवणाऱ्या थंडीमुळे मत्स्यदुष्काळाचे सावट निर्माण

0

मागील चार दिवसांपासून सुटलेल्या गारठवणाऱ्या वाऱ्यांचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनावर झाला आहे. दोन दिवसांपासून मासेमारी करणाऱ्या नौकांना रिपोर्टच मिळत नसल्याने मच्छीमार पर्णतः हताश झाले आहे. मासळीच मिळत नसल्याचे गिलनेटसह छोटे मच्छीमार अडचणीत आले असून मत्स्यदुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. बाजारात मासळीची आवक घटल्याने मासळीचे दरही गगनाला भिडले आहेत. मागील दोन दिवसांपासून बाजारात मासळीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मिरकरवाडा जेटीवरही बुधवारी ताजी मासळी खरेदीसाठी गेलेल्या खवय्यांची निराशा झाली. मासळी कमी मिळत असल्यामुळे आहे त्या माशांचे दर वधारले आहेत. बांगडा किलोला २५० ते ३०० रुपये, सौंदाळा किलोला ३०० रुपये, पापलेट किलोला ७०० रुपये तर टायनी चिंगळं दोनशे रुपयांवरुन साडेचारशे रूपये किलोनी विकली जात आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात बऱ्यापैकी रिपोर्ट असतो. परंतु यंदा मासेच मिळत नसल्यामुळे नौका उभ्या करुन ठेवल्या आहेत. मागील चार ते पाच वर्षांमध्ये सातत्याने मत्स्योत्पादनात घट होत आहे. पर्याय म्हणून शासनाने पर्ससीननेटद्वारे मासेमारीवर बंधने आणली. तरीही मासेमारीच्या उत्पादनातील घट दिवसेंदिवस वाढतच आहे. यंदा मोसमाच्या सुरवातीलाच निसर्गाने मच्छीमारांना धोका दिला. त्यानंतर सतत दहा ते पंधरा दिवसांनी वातावरण बदलल्यामुळे मच्छीमारी ठप्प होत होती. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत अनेक वादळे येऊन गेली. नोव्हेंबर महिना वगळता त्यापूर्वी आणि त्यानंतर मच्छीमारांना पाहिजे तशी मासळी मिळालीच नाही. गतवर्षी मिरकरवाडा बंदरातील मच्छीमारांना सरासरी मासे मिळत होते. त्यातुन खर्च वजा जाता उत्पन्न मिळत होते. १ जानेवारीपासून पर्ससीननेट मच्छीमारी बंद झाल्यानंतरही पाहीजे तसे मासे मिळत नाहीत. जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यात मासळी उतरवण्याची केंद्र आहेत. मासे मिळत नसल्याने अनेक मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावर उभ्या केल्या असून खलाशांना माघारी पाठविले आहे. खलाशांवर खर्च करणे शक्य नसल्याने अडचण होत आहे. सोमवारी काही मच्छीमार समुद्रात ३० वावात गेले होते. त्यांच्या हाती काहीच लागले नाही. वाहतुकीचा खर्चही मिळाला नाही. मिऱ्या येथील गिलनेटवाल्यांना दोन ते तीन किलो बांगडा, सौंदाळा असे मासे मिळाले. ट्रॉलिंगला बांगडा मिळतोय, पण प्रमाणे कमी आहे. गतवर्षी जानेवारी, डिसेंबर महिन्यात चांगली मासळी मिळाली होती. यंदा मोठी घट झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here