मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीपुळे येथे १७ ला भूमिपूजन

0

रत्नागिरी : गणपतीपुळे आराखड्यातील एकशे दोन कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १७ ला होणार आहे. त्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गणपतीपुळे दौरा करून बैठका घेतल्या. गणपतीपुळेच्या विकासात सर्व ग्रामस्थांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून काम करावे, असे आवाहनही सामंत यांनी केले. गणपतीपुळे झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयवंत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषद बांधकाम सभापती बापू म्हाप, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री १७ फेब्रुवारी रोजी गणपतीपुळे येथे दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तत्पर राहून आपली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना सामंत यांनी दिल्या. तसेच पार्किंग व्यवस्था, सभेचे ठिकाण, हेलिपॅड मुख्यमंत्र्यांच्या उतरण्याच्या ठिकाणाची पाहणी केली. उदय सामंत यांनी गणपतीपुळे विकास आराखड्यासाठी मंजूर निधीतून होणार असलेल्या रस्ते, सांडपाणी व्यवस्था, घनकचरा आदी कामांच्या सद्यस्थिती प्रक्रियेचा आढावा घेतला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here