‘शहराला दिवसाआड पाणी हे सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचे उत्तम उदाहरण’ – जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन

0

रत्नागिरी शहराला एक दिवसाआड पाणी देण्याची घोषणा शहरात केली जात आहे. पाण्याचा पुरेसा साठा असताना एक दिवसाआड पाणी पुरवण्याची वेळ येणे म्हणजे पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे, अशी टीका भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन यांनी केली आहे. श्री. पटवर्धन म्हणाले, रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात भरपूर पाणी आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने मंजूर केलेले ५४ कोटी रुपये गेली दोन ते अडीच वर्षे नगरपालिकेकडे पडून आहेत. मात्र जनता पाण्यासाठी त्रस्त आहे. जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणे चांगले नाही. नियोजनशून्य कारभाराचे हे उत्तम उदाहरण आहे. सत्ताधाऱ्यांची अकार्यक्षमताच त्यातून सिद्ध होत आहे. दरवेळी मुख्य जलवाहिनीची गळती होत असल्याचे कारण ऐकून नागरिक कंटाळले आहेत. मार्च महिन्यातच एक दिवसाआड पाणी देण्याची वेळ येते, यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही, असे सांगून श्री. पटवर्धन म्हणाले, पालिकेने पाणी प्रश्नाुवर राजकारण न करता मुबलक पाणीपुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे, पाणीपुरवठा नियमित व्हावा. १५ दिवस पाणी पुरवून ३० दिवसांचे पाणी बिल आकारण्याची लुबाडणूक पालिकेने बंद करावी. लोकनियुक्त प्रतिनिधींनी आत्मचिंतन करून ही व्यवस्था सुधारण्यासाठी विवेकबुद्धी वापरावी, अशी अपेक्षा अॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here