दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्ला

0

रायगडमधील माणगाव पोलिसांवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली असून यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे आणि हवालदार टेकाळे अशी या दोघांची नावे आहेत. आज पहाटे 3 च्या सुमारास ही घटना घडली असून दरोडेखोर फरार आहेत. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे. तसेच जिल्ह्यात नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक मंगळवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास मक्झिमो व इको कारचा किरकोळ अपघात होता. त्यावेळी इको कारचालक व मक्झिमो कारचालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर मॅक्झिमो कारचालक व गाड़ीतील तिघे जण पळून गेले. त्याचवेळी रात्रीची गस्ती घालणारे माणगाव पोलीस सहाय्यक निरीक्षक सागर कावळे व वाहन चालक टेकाळे हे दोघे त्याठिकाणी आले. मक्झिमो चालकाने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे यांनी मक्झिमो कारचालक याला घेऊन इको कार चालक राहत असलेल्या वाढवण या गावात गेले. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी इको कारचालक यांचा दरवाजा ठोठावला असता घरातून तीन पुरुष आणि एक महिला बाहेर आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करून एका पुरुषाने सागर कावळे यांच्या डोक्यात सळी मारून व डाव्या पायावर लाथेने मारले. यामध्ये कावळे हे गंभीर जखमी झाले. तर पोलीस चालक टेकाळे यांच्या पायावर फावड्याने झोड टाकून त्यांनाही जखमी केले. या प्रकारानंतर कावळे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात फोन करून झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर माणगाव पोलीस घटनास्थळी पोहचून कावळे आणि टेकाळे याना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे आरोपी हे फरार झाले असून त्यांचा शोध माणगाव पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here