संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट असताना हा हुकूमशहा करतोय मिसाईल चाचणी

0

प्योंगयांग – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरसच्या संकटाला संपूर्ण जग आव्हान देत आहे. आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांना जीव गेला आहे. सुमारे तीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगातील बहुतांश देश प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग-उन यांनी मिसाईल चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्रांच्या चाचणी दरम्यान किम जोंग उन स्वत: तेथे उपस्थित होता. उत्तर कोरियाने शनिवारी उत्तर प्योंगान प्रांतातून दोन शॉर्ट रेंजच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पूर्वेकडील समुद्रात डागल्याची माहिती आहे. न्यूज एजन्सी योनहॅप यांनी दक्षिण कोरियाच्या ‘जॉइंट चीफ ऑफ स्टाफ’च्या हवाल्याने ही माहिती दिली. बीबीसीच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाने या महिन्याच्या सुरूवातीला ‘फायरिंग ड्रिल’चा एक भाग म्हणून अनेक क्षेपणास्त्रे उडवली आहेत. अमेरिका, चीनने उत्तर कोरियाला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवून पुन्हा चर्चेचं आवाहन केलं आहे. या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्यानंतर दक्षिण कोरियाच्या सैन्याने सांगितले की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उत्तर कोरियाने 10 एप्रिल रोजी सुप्रीम पीपल्स असेंब्लीचे (देशातील संसद) अधिवेशन घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर हे मिसाईल प्रक्षेपण करण्यात आलं आहे. या बैठकीला सुमारे 700 नेते उपस्थित राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या देशात कोरोनाचाही एकही रुग्ण आढळला नाही असा दावा केला होता. कम्युनिस्ट देशाने कोरोना विषाणूवर मात केल्याचा दावा केला. 30 दिवसांपासून प्रत्येकाला विलग ठेवून, सीमा बंद करून आणि चीनबरोबर व्यापार थांबवून त्यांनी कोरोनावर मात केली आहे असा दावा किम जोंगने केला. पण हे अशक्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात. उत्तर कोरिया कोरोनाचं संकट लपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सीआयएचे उत्तर कोरियाचे तज्ञ जंग एच पाक यांनी सांगितले की, कोरोनाची लागण न झाल्याची एकही घटना उत्तर कोरियाला होणे अशक्य आहे. किम जोंग-उनने उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेकडे, मानवी हक्कांचे उल्लंघन करणे आणि अन्य गुन्ह्यांपासून लक्ष वळविण्यासाठी हा अविश्वसनीय दावा केला आहे असा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here