पाकिस्तानमध्ये पेट्रोल 15 आणि डिझल 27 रुपये प्रति लिटर स्वस्त

अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थिती, कर्जाचा बोजा आणि कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती 15 ते 38 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. नवीन दर 1 मेपासून म्हणजे शुक्रवारपासून लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमती कमी झाल्या असल्याचा फायदा आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाकिस्तानने दर कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नागरीकांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा निर्णय पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. डॉनच्या वृत्तानुसार, या निर्णयामुळे पाकिस्तानमधील पेट्रोलचे दर 15 रुपयांनी खाली आले आहेत. तर डिझलच्या किंमती 27 रुपयांनी खाली आल्या आहेत. सरकारच्या निर्णयामध्ये पेट्रोलची एक्स-डिपो किंमत प्रति लीटर 81.58 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यासह, पाकिस्तान सरकारने यावरील करात प्रतिलिटर 5.68 रुपयांची वाढ केली आहे. एकीकडे पाकिस्तानमधील पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींमध्ये मोठी कपात झाली आहे. तर दुसरीकडे, हिंदुस्थानात आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमतींमध्ये घसरण असूनही, पेट्रोल-डिझलच्या किंमती मागील अनेक दिवसांपासून कोणतेही बदल झालेले नाही. 14 मार्चपासून देशातील बड्या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल 76.31 रुपये तर डिझल 66.21 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here