आशा, गटप्रवर्तक आजपासून काळ्या फिती लावून करणार काम

रत्नागिरी : मानधनवाढीसह कोरोनाच्या कालावधीत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज ११ मेपासून ते १३ मेपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने मागण्यांची दखल घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे शंकर पुजारी, सुमन पुजारी यांनी दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागात आशा व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांना निश्चित मानधन मिळावे, त्यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा मिळावा आणि त्यांचे मानधही वाढवण्यात यावे अशी मागणी कृती समितीने केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर आशा व गटप्रवर्तकानी जीवाची पर्वा न करता, कुटुंबाचा विरोध सहन करून, मुलाबाळांच्या आरोग्याची चिंता न करता गावपातळीवर काम केले. त्यांच्या कामाचे खूप कौतुक केले जात आहे; परंतु कौतुकाने पोट भरत नाही. बहुसंख्य आशा अल्प उत्पन्न गटातील, गरीब घरातील आहेत. राज्य शासनाने 16 सप्टेंबर 2019 ला 2000 रुपये मानधनात वाढ केली. परंतु गटप्रवर्तक यांच्या मानधनात एक रुपया देखील वाढ केली नाही. त्यामुळे गटप्रवर्तक यांच्यात प्रचंड नाराजी व असंतोष आहे. सेविकांना दरमहा पाच हजार रुपये ठराविक वेतन द्यावे, गटप्रवर्तकाना दरमहा दहा हजार रुपये ठराविक वेतन द्यावे, लॉकडाऊन काळात गटप्रवर्तकांना दरमहा पाचशे रुपये मिळावेत, दररोज 300 रुपये प्रोत्साहनपर भत्ता मिळावा. आशा व गटप्रवर्तकांना मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायजर, पीपीइ किट आदी संरक्षण साधने उपलब्ध व्हावीत. 50 वर्षावरील किंवा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असलेल्या सेविकांना कोरोना साथ रोगाच्या कामाची जबाबदारी देऊ नये, किमान वेतन लागू करावे, मोफत व नियमित वैद्यकीय तपासणी करावी, 50 लाख रकमेचा विमा मंजूर करावा यासह विविध मागण्या कृती समितीकडून करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here