औषध व्यावसायिकांना विमा संरक्षण मिळावे; आ. शेखर निकम यांची मागणी

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या औषध व्यावसायिकांना विम्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आपला जीव धोक्यात घालून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना शासनामार्फत विमा योजनेची सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग असलेले औषध व्यावसायिक आपली जबाबदारी समर्थपणे पार पडत आहेत. आवश्यकतेप्रमाणे गरजूंना औषधे घरपोच देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६०० औषध विक्रेते आणि ८०० वितरक आणि त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवा प्रतिनिधी म्हणून किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते, कर्मचारी यांना शासनामार्फत जाहीर झालेल्या सेवा-सवलती विशेषत: जीवन विम्यासारखे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेते, कर्मचारी यांना आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून विम्यासारख्या सुविधेचा लाभ मिळावा, अशी विनंती आ. शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here